गुप्तधनाच्या शोधासाठी जंगलात अघोरी पूजा; सहा जणांना मध्यरात्री अटक

अघोरी पूजेसाठी वापरले जाणारे साहित्य जप्त
महिलांचे फोटो, केस आणि ताबीज पाहून पोलिसही हादरले

यवतमाळ जिल्ह्यात गुप्तधनाच्या हव्यासातून अघोरी पूजा केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. वडगाव जंगल परिसरात मध्यरात्री सुरू असलेल्या या संशयास्पद हालचालींवर पोलिसांनी छापा टाकत सहा जणांना अटक केली. घटनास्थळावरून अघोरी पूजेशी संबंधित विविध साहित्य जप्त करण्यात आले. महिलांचे फोटो, केस, ताबीज आणि काळ्या बाहुल्या आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी अंधश्रद्धा प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.


यवतमाळ : जिल्ह्यातील वडगाव जंगल पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या कारेगाव शिवारात गुप्तधनाच्या शोधासाठी अघोरी पूजा सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी मध्यरात्री गस्तीदरम्यान कारवाई करत सहा जणांना ताब्यात घेतले.

पोलिसांना वरूड ते कारेगाव मार्गावर संशयास्पद स्थितीत एक वाहन उभे असल्याचे दिसले. वाहनाची तपासणी केली असता अघोरी पूजेसाठी वापरले जाणारे विविध साहित्य आढळून आले. यात कुदळ, अगरबत्ती, ज्वारीचे पीठ, काळ्या बाहुल्या, त्रिशूल, रुद्राक्ष माळ, लिंबू, केस, सुया, ताबीज आणि रंगीबेरंगी धागे यांचा समावेश होता.

या प्रकरणी पोलिसांनी अशोक रामधन राठोड (50), रितेश रवी भगत (19), लीलेश्वर विश्वनाथ बावणे (26), कुंदन (28), वीरेंद्र रमेश गायकवाड (35) आणि केशव राठोड (50) यांना अटक केली आहे. आरोपी हे प्रामुख्याने वाशिम आणि आर्णी परिसरातील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे.

पोलिसांनी आरोपींविरोधात महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा आणि जादूटोणा प्रतिबंधक कायदा 2013 अंतर्गत विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, घटनास्थळी काही महिलांचे फोटो आणि केस देखील आढळून आले. तसेच अघोरी पूजेसाठी वापरले जाणारे पंचधातूचे कंगण आणि इतर वस्तूही पोलिसांनी जप्त केल्या. या प्रकरणातील वीरेंद्र गायकवाड हा स्वतःला पूजारी सांगत असल्याची माहिती तपासात समोर आली आहे. पोलिसांकडून आता या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.