चंदननगर परिसरात तरुणीचा गळा चिरण्याचा प्रयत्न; आरोपी फरार
नसरापूर घटनेनंतर पुण्यात पुन्हा संतापजनक प्रकार, पोलिस तपास सुरू
पुण्यात पुन्हा एक धक्कादायक गुन्हेगारी घटना घडली असून प्रेमप्रकरणातून एका 22 वर्षीय तरुणीवर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. चंदननगर परिसरातील पाठारेवस्ती येथे घडलेल्या या घटनेत तरुणीचा गळा चिरण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे समोर आले आहे. गंभीर जखमी अवस्थेत तरुणीवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून तिची प्रकृती चिंताजनक आहे. आरोपी फरार असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. या घटनेमुळे परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
पुणे : शहरातील चंदननगर परिसरातील पाठारेवस्ती येथे प्रेमप्रकरणातून झालेल्या वादातून एका तरुणीवर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 22 वर्षीय तरुणी आणि आरोपी एकाच मॉलमध्ये काम करत होते. तिथूनच त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून दोघांमध्ये वाद सुरू होता.
या वादाचे रूपांतर गंभीर घटनेत झाले असून आरोपीने तरुणीचा गळा चिरण्याचा प्रयत्न केला. हल्ल्यानंतर तरुणी रक्तबंबाळ अवस्थेत पडली होती.
घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला. तरुणीने गंभीर अवस्थेत असतानाही आपल्या भावाला फोन करून घटनेची माहिती दिली. “मला मारलं आहे, खूप लागलं आहे,” असे तिने सांगितल्याचे समजते.
तरुणीने व्हिडीओ कॉलद्वारे भावाला आपली अवस्था दाखवली. त्या वेळी ती अत्यंत गंभीर अवस्थेत असल्याचे दिसून आले. त्यानंतर स्थानिक नागरिकांच्या मदतीने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात दिलीप राठोड याच्यावर संशय व्यक्त करण्यात आला असून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीचा भाऊ भगतसिंग जसवंतसिंग दोहरे यांनी तक्रार दाखल केली आहे.
सध्या तरुणीवर रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून तिची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला आहे.
या घटनेपूर्वी नसरापूर परिसरात घडलेल्या अत्याचाराच्या घटनेमुळे आधीच वातावरण तणावपूर्ण असताना, या नव्या घटनेमुळे पुण्यातील गुन्हेगारीवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.











