वाटूळ येथील आदर्श विद्यामंदिर प्रशालेचा बोर्ड परीक्षेत दैदिप्यमान निकाल; 97.30% यशाची परंपरा कायम

राजापूर ( प्रतिनिधी ):वाटूळ येथील आदर्श विद्यामंदिर प्रशालेने 2026 च्या माध्यमिक शालांत बोर्ड परीक्षेत पुन्हा एकदा उत्तम निकालाची परंपरा कायम ठेवली आहे. शाळेचा यंदाचा निकाल 97.30% लागला असून 13 विद्यार्थी विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण झाले आहेत.

यावर्षी परीक्षेसाठी एकूण 37 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते, त्यापैकी 36 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. शाळेच्या इतिहासात प्रथमच आशिष अनिल गोबरे याने 96% गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला. नीरजा राजापकर हिने 92% गुणांसह द्वितीय, तर शुभ्रा प्रसन्न खांबे व प्राची संतोष राजापकर यांनी प्रत्येकी 89% गुण मिळवून तृतीय क्रमांक संयुक्तपणे मिळविला.

शाळेच्या या उज्ज्वल यशाबद्दल विद्याविकास मंडळ, मुंबई संस्थेचे अध्यक्ष व पदाधिकारी, शाळा समितीचे अध्यक्ष व सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती तसेच माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष व पदाधिकारी यांनी सर्व यशस्वी विद्यार्थी, मुख्याध्यापक संदीप मयेकर व मार्गदर्शक शिक्षकवृंद यांचे अभिनंदन केले आहे.
निकालाबद्दल प्रतिक्रिया देताना मुख्याध्यापक संदीप मयेकर म्हणाले, “केवळ उत्तीर्णतेचे प्रमाणच नव्हे, तर गुणवत्तापूर्ण निकाल लागल्याने आम्हाला विशेष समाधान आहे. विद्यार्थ्यांची मेहनत, पालकांचे सहकार्य आणि शिक्षकांचे मार्गदर्शन यामुळेच हे यश शक्य झाले.”