पुलवामा हल्ल्याचा मास्टरमाईंड पाकिस्तानात ठार

 

इस्लामाबाद : २०१९ मधील पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड मानला जाणारा दहशतवादी हमजा बुरहान याची पाकिस्तानात अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली. पाकव्याप्त काश्मीरमधील मुझफ्फराबाद येथे ही घटना घडली. हमजा बुरहान आपल्या कार्यालयात बसलेला असताना काही अज्ञात व्यक्तींनी त्याच्यावर बेछूट गोळीबार केला. या हल्ल्यात त्याचा जागीच मृत्यू झाला.

१४ फेब्रुवारी २०१९ रोजी जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे भारतीय जवानांच्या ताफ्यावर झालेल्या आत्मघाती हल्ल्यात ४० हून अधिक जवान शहीद झाले होते. या भीषण हल्ल्याच्या कटात हमजा बुरहानचा सहभाग असल्याचे सांगितले जाते. तो स्वतःची ओळख शिक्षक म्हणून करून देत असला तरी शिक्षकी पेशाच्या आडून दहशतवादी कारवाया करत होता.

सूत्रांच्या माहितीनुसार, २०१९ नंतरही हमजा बुरहान विविध दहशतवादी संघटनांना प्रशिक्षण देणे, सीमावर्ती भागातून घुसखोरीस मदत करणे आणि दहशतवादी कारवायांचे नियोजन करणे अशा कामांत सक्रिय होता. त्याच्या हत्येनंतर पाकिस्तानातील दहशतवादी संघटनांमध्ये खळबळ उडाली आहे.

पुलवामा हल्ल्यानंतर भारताने बालाकोट येथे एअर स्ट्राईक करत दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले होते. त्यानंतर पाकिस्तानातील अनेक दहशतवादी आणि त्यांच्या म्होरक्यांवर अज्ञात हल्लेखोरांकडून हल्ले होत असल्याच्या घटना सातत्याने समोर येत आहेत.