कणकवलीत वादळी वाऱ्याचा तडाखा!

घरावर झाडाची फांदी कोसळून नुकसान!

चौंडेश्वरी मंदिर परिसरातील घटना; सुदैवाने जीवितहानी टळली

कणकवली : शनिवारी मध्यरात्रीपासून कणकवली शहरासह ग्रामीण भागात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली. विजांच्या कडकडाटासह सुरू असलेल्या या पावसामुळे अनेक ठिकाणी भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. याचदरम्यान शहरातील चौंडेश्वरी मंदिर परिसरात नगरसेवक बंडू हर्णे यांच्या घरावर रुद्राक्षाच्या झाडाची मोठी फांदी कोसळली. या घटनेत घराच्या कौले फुटून नुकसान झाले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसल्याने मोठा अनर्थ टळला.

 

गेल्या काही दिवसांपासून तालुक्यात मान्सूनपूर्व पावसाच्या सरी कोसळत असून कणकवलीसह आजूबाजूच्या गावांमध्येही पावसाचा जोर कायम आहे. वातावरण ढगाळ असून अधूनमधून वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू असल्याने नागरिकांमध्ये सतर्कतेचे वातावरण आहे. दरम्यान, शेतकरी वर्गाकडून मान्सूनच्या पावसाला सुरुवात झाल्याची चर्चा सुरू झाली आहे. बदलत्या हवामानामुळे शेती कामांनाही वेग येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. वादळी वारे आणि मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा अलर्ट मोडवर ठेवावी, तसेच संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासनाने आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.