बकरी ईद पार्श्वभूमीवर खेड तालुका शांतता कमिटीची बैठक उत्साहात

खेड (प्रतिनिधी) : मुस्लिम बांधवांच्या बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर खेड तालुका शांतता कमिटीची बैठक २२ मे रोजी खेड पोलीस स्थानकात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. बकरी ईद सण शांततेत आणि उत्साहात साजरा व्हावा यासाठी सर्व नागरिकांनी पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी शैलेश सणस यांनी यावेळी केले.
खेड पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक विवेक अहिरे यांच्या दालनात आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीला सेना शहरप्रमुख कुंदन सातपुते, माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर, नगरसेवक आरिफ मुल्लाजी, नगरसेवक रहिम सहीबोले, मुतलीब घरटे, उद्योजक सिकंदर मुसा, प्रशांत गमरे, हसनमिया रिफाई, सरफराज पांगारकर यांच्यासह विविध क्षेत्रातील नागरिक उपस्थित होते.
बैठकीदरम्यान खेड-भरणानाका मार्गावरील रस्त्याची दुरुस्ती पूर्ण झाल्यानंतर आवश्यक ठिकाणी गतीरोधक बसविण्याची मागणी करण्यात आली. तसेच बॉक्ससाईड वाहतुकीवर नियंत्रण ठेवावे, भरणानाका परिसरात मद्यपान करून वाहन चालविणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी आणि रात्रीच्या वेळी भरणानाका ते भोस्ते घाट परिसरात पार्किंग लाईट न लावता रस्त्याच्या कडेला वाहने उभी करणाऱ्या चालकांवर कारवाई करावी, अशी मागणीही करण्यात आली.
ग्रामीण भागातील वयोवृद्ध नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने ग्रामरक्षक दल उभारण्याचा मुद्दाही बैठकीत चर्चिला गेला. अनेक वृद्ध महिला व पुरुष घरात एकटे राहत असल्याने त्यांची वेळोवेळी विचारपूस करून त्यांना आधार देणे आणि त्यांच्या सुरक्षेकडे लक्ष देणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. पोलीस पाटील, बीट अंमलदार आणि पोलीस दुरक्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या मदतीने ग्रामरक्षक दल उभारून वयोवृद्धांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्याची संकल्पना पुढे आली.
यावेळी खेड परिसरात वाढत चाललेल्या ई-सिगारेट, गांजा, चरस आणि नशेच्या गोळ्यांच्या वापराबाबतही गंभीर चिंता व्यक्त करण्यात आली. रात्री उशिरापर्यंत काही तरुण नशेच्या आहारी जात असल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले. अशा प्रकारच्या अमली पदार्थांची विक्री कुठून होत आहे याची चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी सदस्यांनी केली. नशेच्या विळख्यात अडकलेल्या तरुणांना त्यातून बाहेर काढण्यासाठी सामाजिक स्तरावर प्रयत्न होणे गरजेचे असल्याचे मतही व्यक्त करण्यात आले.
उपविभागीय पोलीस अधिकारी शैलेश सणस यांनी खेडमध्ये बकरी ईद सण नेहमीच शांततेत साजरा केला जातो, यंदाही शांततेला बाधा येणार नाही याची खबरदारी सर्वांनी घ्यावी, असे सांगितले. शांतता कमिटी सदस्य, गावचे पोलीस पाटील आणि नागरिकांनी सतर्क राहून पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. तसेच ई-सिगारेट आणि नशेच्या पदार्थांच्या विक्रीवर पोलीस प्रशासनाकडून विशेष लक्ष ठेवले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.