अमित साटम यांच्या हस्ते उद्घाटन;
अनेक वर्षांची मागणी पूर्ण झाल्याने ग्रामस्थांत समाधान
शिरगाव (प्रतिनिधी) :
चाफेड-साळकरवाडी येथील ग्रामस्थांची अनेक वर्षांची मागणी अखेर पूर्ण झाली असून नव्याने उभारण्यात आलेल्या बस थांब्याचे लोकार्पण देवगड तालुका भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष अमित साटम यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली ग्रामस्थांची मागणी पूर्ण झाल्याने परिसरात समाधानाचे वातावरण आहे.
चाफेड गावचे युवा सरपंच साहिल मंगेश पांचाळ यांच्या पुढाकारातून आणि समाजसेवक अवधूत साळकर यांच्या सहकार्याने साळकरवाडी बस थांब्याचे काम पूर्ण करण्यात आले. त्यामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला हा प्रश्न मार्गी लागून ग्रामस्थांची अनेक वर्षांची मागणी अखेर पूर्ण झाली.
या उद्घाटन समारंभाला ग्रामपंचायत सदस्य सुनील कांडर, सुदर्शन (नागेश) साळकर, ज्येष्ठ मार्गदर्शक चंद्रकांत साटम, सत्यवान साटम, मंगेश साळकर, अशोक साळकर आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच चाफेड व पिंपळवाडी परिसरातील ग्रामस्थांनीही मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य सुदर्शन (नागेश) साळकर यांनी अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला बस थांब्याचा प्रश्न मार्गी लागल्याबद्दल समाधान व्यक्त केले. तसेच या विकासकामासाठी सहकार्य करणाऱ्या सर्वांचे त्यांनी आभार मानले.
साळकरवाडी बस थांबा उभारण्यात आल्याने परिसरातील विद्यार्थी, प्रवासी आणि ज्येष्ठ नागरिकांची मोठी सोय झाली असून ग्रामस्थांकडून या विकासकामाचे स्वागत करण्यात येत आहे.












