पाटपन्हाळे (वार्ताहर ) नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा यांच्यातर्फे गुहागर व शृंगारतळी परिसरातील श्री सदस्यांनी स्वच्छता मोहिम राबविली. गुहागर -विजापूर मार्गावरील गुहागर रुग्णालय ते मोडकाघर व वेळंब रोड ते जानवळे फाटा या दरम्यान ही स्वच्छता करण्यात आली.
नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त प्रतिष्ठानतर्फे या परिसराला दत्तक स्वरुपात घेऊन ते वर्षभर स्वच्छ ठेवण्याचे अभियान राबविण्यात येत आहे. गुहागरमधील कचरा नगरपंचायतीच्या वाहनाने घनकचरा जागेमध्ये टाकण्यात आला. श्री सदस्यांमार्फत ही स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. कित्येक गावांमध्ये अशा पध्दतीने स्वच्छता मोहिम राबविण्यात येते. गुहागर तालुक्यात श्री सदस्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. त्यामुळे प्रत्येक गावात अध्यात्मिकतेला प्रतिसाद मिळत आहे. यातूनच सामाजिक कार्य हाती घेतली जात आहे. धर्माधिकारी प्रतिष्ठानने ही एक सामाजिक बांधिलकी जपलेली असल्याने त्यांच्या उपक्रमाचे कौतुक होत आहे.










