राष्ट्रवादीचे पदाधिकारी यांची मागणी, लांजा तहसीलदारांना निवेदन
लांजा (प्रतिनिधी) पत्रकार संदिप महाजन यांच्यावर हल्ला करण्याऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे पदाधिकारी बाबा धावणे, दाजी गडहिरे यांनी केली असुन या मागणीचे निवेदन , लांजा तहसीलदारांना सादर करण्यात आले आहे.लांजा तहसीलदारां मार्फत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर करण्यातआलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्रामध्ये सरकारच्या विरोधात कोणी ब्र शब्द काढला किंवा सरकारच्या चुकीच्या गोष्टींच्या विरोधात कोणी आवाज काढला की सरकार मधील आमदार किंवा खसदारांचे गावगुंड मारहाण किंवा खून करत आहेत असे वातावरण राज्यामध्ये तयार झाले आहे.
गेल्या काही दिवसांमध्ये असेच एक प्रकरण झाले. शेतकऱ्यांची बाजू मांडणारा कोकणातील एक पत्रकार वारिशे यांच्या अंगावर गाडी घालून हत्या करण्यात आली होती. आज सुध्दा हेच जळगाव मध्ये घडले आहे.
संदिप महाजन या पत्रकाराने मुख्यमंत्री यांच्या चुकीच्या धोरणावर आवाज उठवल्यानंतर त्यांचे समर्थक आमदार किशोर पाटील यांनी फोनवरून पत्रकार संदिप महाजन यांना धमकी दिली होती. त्यानंतर त्यांच्या समर्थकांकडून पत्रकारांवर हल्ला करण्यात आला आहे.तरी आमदार किशोर पाटील व मारहाण करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी. कारण देशात लोकशाही जिवंत ठेवण्याचे काम चौथा स्तंभ म्हणून पत्रकार करत असतात. त्यामुळे लोकशाही टीकवण्यासाठी लोकशाहीचा आवाज दाबणाऱ्यांवर कारवाई करून आपण राज्याचे संवेदनशील गृहमंत्री असल्याचे जनतेला दाखवण्याची गरज आहे. तसेच आम्ही सदर घटनेच्या जाहीर निषेध करतो
सदर निवेदन सादर करताना राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे बाबा धावणे व राष्ट्रवादी मागासवर्गीय सेलचे दाजी गडहिरे हे उपस्थित होते.












