करुळ येथे पर्यावरण दिनानिमित्त स्वच्छता मोहीम
मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबूडकर मोहिमेत सहभागी
वैभववाडी l प्रतिनिधी : कचऱ्याची जबाबदारी प्रत्येकाने घेतली पाहिजे. घाटमाथा आणि कोकण यांना जोडणारा करुळ घाटमार्ग हा प्रमुख मार्ग आहे. या मार्गावरील सर्व व्यावसायीकानी परिसरातील कचऱ्याची काळजी घेतली पाहिजे. या मार्गावर जास्तीत जास्त कचरा कुंड्या तसेच सुलभ शौचालय उपलब्ध करून दिले जातील. करुळ घाट परिसर स्वच्छ व सुंदर करण्यासाठी विशेष उपाययोजना करण्यात येतील. असे प्रतिपादन मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांनी केले.
ग्रामपंचायत करुळ व पंचायत समिती वैभववाडी यांच्या वतीने करुळ येथे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पोलीस तपासणी नाका परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. खेबुडकर सहभागी झाले होते. यावेळी ग्रामपंचायत सभागृहात श्री खेबुडकर यांनी उपस्थिताना मार्गदर्शन केले. याप्रसंगी सभापती सिद्धेश रावराणे, उपसभापती साची कोलते, सरपंच नरेंद्र कोलते, पंचायत समिती सदस्य देवानंद पालांडे, मंगेश लोके, श्रावणी रावराणे, गटविकास अधिकारी प्रिमेश वाघ, जिल्हा बँक माजी संचालक दिगंबर पाटील, उपसरपंच भास्कर सावंत, विस्तार अधिकारी प्रकाश अडुळकर, प्रकाश सावंत, विलास गुरव, सचिन कोलते, ग्रामसेवक शशिकांत गुरव, शरद सावंत, महेश कदम, संतोष टक्के, अशोक राणे, दीपक घाडगे, उदय कदम, पंचायत समिती अधिकारी, कर्मचारी, गावातील कर्मचारी, शिक्षक, अंगणवाडी सेविका, बचत गट प्रतिनिधी, कृषीकन्या व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सर्व चेक नाका परिसर तसेच माध्यमिक विद्यालय परिसर या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. श्री खेबुडकर यांनी उपस्थित पोलीस कर्मचाऱ्यांना सूचना केल्या. या मार्गावर जास्तीत जास्त सुशोभीकरणासाठी निधी उपलब्ध करण्यात येईल तसेच नाधवडे, कोकिसरे, एडगाव व करूळ परिसरात कचराकुंड्यांची व्यवस्था केली जाईल. पर्यटकांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी सुलभ शौचालय देखील उभारण्यात येईल असे श्री. खेबुडकर सांगितले.











