१५ ऑगस्ट रोजी कार्यालयाचे उदघाटन
राजापूर (वार्ताहर): राजापूर तालुक्यातील काजू व आंबा उत्पादक शेतकरी यांना खात्रीशीर हमिभाव मिळवून देणे तसेच शेतकऱ्यांचे दरडोई उत्पन्न वाढविणे या हेतुने राजापूरात नाबार्ड बकेच्या सहकार्याने ‘राजंगा फार्मर प्रोडयुसर’ कंपनीची स्थापना करण्यात आली आहे. या कंपनीच्या अधिकृत कार्यालयाचे उद्घाटन मंगळवार १५ ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आला आहे.शहर बाजारपेठेत विठ्ठल मंदिर नजीक हे कंपनीचे कार्यालय सुरू करण्यात येत आहे. सकाळी ११ वाजता उपविभागीय अधिकारी श्रीमती वैशाली माने, तहसिलदार सौ. शितल जाधव यांच्या हस्ते या कार्यालयाचे उद्घाटन होणार आहे. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उद्योजक किरण सामंत, नाबार्ड चे जिल्हा व्यवस्थापक मंगेश कुलकर्णी, गटविकास अधिकारी विवेक गुंड, तालुका कृषी अधिकारी अनिल गावित, कृषी अधिकारी विद्या पाटील, आत्माचे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक वैभव अमरे, टेक्नोसर्वचे प्रोजेक्ट मॅनेजर गजानन पाटील, संदिप कांबळे आदी उपस्थीत राहणार आहेत.
राजंगा फार्मर प्रोड्यूसर कंपनी स्थापन करताना ‘राजापूर व राजापुरातील प्रसिद्ध स्थान ‘गंगातीर्थ’ यांची संधी करून ‘राजंगा’ हे नाव देण्यात आलेल आहे. राजापूर तालुक्यातील काजू व आंबा उत्पादक शेतकरी यांना खात्रीशीर हमिभाव मिळवून देणे तसेच शेतकऱ्यांचे दरडोई उत्पन्न वाढविणे ही उद्दीष्टे कंपनीची स्थापना करताना ठेवण्यात आली आहेत. यामध्ये शेतकऱ्यांचे आंबा, काजू खरेदी करणे, योग्य व वाजवी दरात बी बियाणे व कीटकांनाशके, खते यांचा पुरवठा करणे, वाजवी दरात कृषि अवजारे मागणीनुसार उपलब्ध करून देणे, पशुधन यांचेसाठी वाजवी दरात खाद्य व सेवा पुरविणे तसेच संचालक व सभासद यांची कंपनीतील शेअर स्वरुपात केलेली गुंतवणूक त्यांना बचत स्वरुपात एका वर्षात परत करणे या अश्या धेय्यप्राप्तीसाठी कंपनी सदैव प्रयत्नशील असणार आहे. शेतकऱ्यांना दोन हजार रूपयांचा शेअर घेवून या कंपनीचे सभासदत्व मिळविता येणार आहे.
तसेच शेतकरी हे सार्वभौम व शाश्वत शेती व राष्ट्र विकाससाठी महत्वपूर्ण, अमूल्य असा कणा असल्याने कंपनीचा शेतकऱ्यांचे प्रती आदर व आपुलकीच्या भावनेतून १ वर्षांचे आत शेतकरी यांनी भरलेली शेअर रक्कम १ वर्षात शेतकरी यांना बचत स्वरुपात परतफेड करण्यासाठी, सभासद शेतकरी यांचे शेतमालाला हमीभाव मिळवून देण्याकरिता तसेच शेतकरी सभासद यांचे सर्वांगिण व शास्वत विकासासाठी कंपनी सदैव प्रयत्नशील राहणार असल्याचे कंपनीचे अध्यक्ष श्री. गोपाळ गोंडाळ यांनी सांगितले.कंपनी कार्यालयाच्या उद्घाटन कार्यक्रमाला सर्व शेतकरी बांधवांनी उपस्थीत राहण्याचे आवाहन श्री. गोंडाळ यांसह उपाध्यक्ष हरेंद्र बाणे, सचिव सायली भोसले, सौ. सुवर्णा अमरे, चंद्रकांत जानस्कर, संतोष राघव, पंकज जाधव, सौ. प्रगती पुजारी, विनायक साखळकर, श्रीमती नम्रता बिर्जे आदींनी केले आहे.










