वैभववाडी तालुक्यात नवागत विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत

जि. प. व पं. स. सदस्यांची प्रमुख उपस्थिती

वैभववाडी प्रतिनिधी :
वैभववाडी तालुक्यात नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात सोमवारी मोठ्या उत्साहात आणि आनंदी वातावरणात करण्यात आली. तालुक्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक तसेच उच्च माध्यमिक शाळांमध्ये नवागत विद्यार्थ्यांचे पारंपरिक पद्धतीने वाजत-गाजत स्वागत करण्यात आले. शाळा परिसर विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने आणि स्वागताच्या विविध कार्यक्रमांनी गजबजून गेला होता.

पहिल्यांदाच शाळेत दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शाळांनी विशेष तयारी केली होती. अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांवर पुष्पवृष्टी करण्यात आली, तर काही शाळांमध्ये फुगे, रांगोळ्या, स्वागत कमानी आणि आकर्षक सजावट करून विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. नवागत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, खाऊ तसेच गुलाबपुष्प देऊन त्यांचा आनंद द्विगुणित करण्यात आला.

कोकिसरे येथील पीएमश्री श्री महालक्ष्मी विद्यामंदिर शाळेत सभापती सिद्देश रावराणे, विद्या मंदिर करूळ गावठण अ येथे उपसभापती साची कोलते,  तर पीएमश्री  दत्त विद्या मंदिर वैभववाडी येथे जि प सदस्या श्रावणी रावराणे,  हेत नं १ येथे जि.प सदस्य प्रमोद रावराणे, उपळे शाळा नं १ पंचायत समिती सदस्य देवानंद पालांडे, मांगवली येथे सुवर्णा संसारे, सांगुळवाडी प. स. सदस्य मंगेश लोके, नाधवडे ब्राह्मणदेव नवलादेवीवाडी येथे प. स. सदस्य साधना नकाशे, लोरे हेळेकरवाडी येथे जि प सदस्य रिद्धी सुतार  यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत केले. त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी ग्रामस्थ, पालक, माजी विद्यार्थी तसेच सरपंच, ग्रामस्थानी उत्स्फूर्त सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी नियमितपणे शिक्षण घेऊन आपले व शाळेचे नाव उज्ज्वल करावे, असे आवाहन यावेळी मान्यवरांनी केले. शिक्षण विभागाच्या विविध उपक्रमांची माहिती विद्यार्थी व पालकांना देण्यात आली. तसेच विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण, स्वच्छता, शिस्त आणि नैतिक मूल्यांचे महत्त्व पटवून देण्यात आले. अनेक शाळांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम, स्वागतगीते आणि प्रबोधनपर उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. शाळांमध्ये उपस्थितीही लक्षणीय होती. नव्या वर्गात प्रवेश, नवीन पुस्तके, नवीन मित्र आणि शिक्षक यामुळे विद्यार्थ्यांमध्ये विशेष आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते.

तालुकाभर झालेल्या या स्वागत उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये शाळेविषयी आत्मीयता निर्माण होण्यास मदत झाली असून नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात उत्साहपूर्ण वातावरणात झाली आहे.