खेड (प्रतिनिधी) : सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर जलस्रोतांतील पाणी काही प्रमाणात गढूळ होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी पिण्याचे पाणी गाळून तसेच उकळून किंवा गरम करूनच वापरावे, असे आवाहन खेड नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा विभागाने केले आहे. याबाबत नगरपरिषदेकडून सार्वजनिक सूचना प्रसिद्ध करण्यात आली असून नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
नगरपरिषदेने दिलेल्या माहितीनुसार, सातत्याने सुरू असलेल्या पावसामुळे जलस्रोतांमध्ये गाळाचे प्रमाण वाढू शकते. त्यामुळे नळाद्वारे पुरवठा होणारे पाणी काही वेळा गढूळ दिसण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा परिस्थितीत नागरिकांनी कोणतीही जोखीम न घेता पिण्याचे पाणी स्वच्छ कापड, मलमलचे कापड किंवा योग्य पाणी गाळणीच्या साहाय्याने गाळून घ्यावे. त्यानंतर ते पाणी किमान दहा मिनिटे उकळून थंड झाल्यावरच पिण्यासाठी वापरावे, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
पाणी गाळून आणि उकळून वापरल्यास दूषित पाण्यामुळे पसरणाऱ्या विविध जलजन्य आजारांचा धोका कमी होण्यास मदत होईल, असेही नगरपरिषदेने नमूद केले आहे. नागरिकांनी या सूचनेचे गांभीर्याने पालन करून स्वतःच्या तसेच कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
खेड नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा विभागाने सर्व नागरिकांनी या सूचनेला सहकार्य करावे, असे आवाहन केले असून पाणीपुरवठा समितीचे सभापती व उपनगराध्यक्ष सतीश उर्फ पप्पू चिकणे यांनी नागरिकांनी सुरक्षित पिण्याच्या पाण्याबाबत दक्षता बाळगावी, असे सांगितले आहे. नगरपरिषदेकडून परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत असून नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.













