केटी बंधाऱ्यांवरून कणकवली पंचायत समितीच्या सभेत खडाजंगी

ठेकेदाराला वाचविण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप

कणकवली : कणकवली पंचायत समितीच्या मासिक सर्वसाधारण सभेत गुरुवारी केटी बंधारे, नादुरुस्त रस्ते, जीर्ण वीज खांब, एसटी सेवा, शिक्षण, आरोग्य तसेच वन्यप्राण्यांमुळे होणारे शेतीचे नुकसान अशा विविध प्रश्नांवर सदस्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. सभापती हर्षदा वाळके यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेला उपसभापती राजेश उर्फ सोनू सावंत, गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, पंचायत समिती सदस्य तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

 

*केटी बंधाऱ्यांबाबत विभागाची दोन वेगवेगळी उत्तरे*

 

पं. स. सदस्य लक्ष्मण गावडे यांनी कनकनगर व बिजलीनगर येथील केटी बंधारे नादुरुस्त असल्याने पाण्याची साठवणूक होत नसल्याचा मुद्दा उपस्थित केला. संबंधित विभागाने बंधारे १५ ते १६ वर्षे जुने झाल्याने दुरुस्तीचे नियोजन सुरू असल्याचे उत्तर दिले. मात्र, मागील सभेत शेतकऱ्यांकडून पाणीचोरी होत असल्यामुळे पाणी साठत नसल्याचे कारण देण्यात आले होते. एकाच विषयावर दोन वेगवेगळी उत्तरे कशी दिली जातात, असा सवाल करत गावडे यांनी ठेकेदाराला वाचविण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप केला. बंधाऱ्यांवरील प्लेट्स योग्य प्रकारे बसविलेल्या नसल्यामुळेच ही परिस्थिती निर्माण झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

 

*पावसाळ्यातच रस्त्यांची कामे; सदस्यांची नाराजी*

 

देवगड – निपाणी राज्य मार्गावरील गटारांची कामे अद्याप अपूर्ण असल्याचा मुद्दा सभेत उपस्थित झाला. संबंधित रस्ता अन्य विभागाकडे हस्तांतरित केल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाने दिली. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ताब्यातील अनेक रस्तेही नादुरुस्त असल्याचे सदस्य पवन भालेकर यांनी सांगितले. पावसाळा सुरू झाल्यानंतरही काही रस्त्यांचे डांबरीकरण सुरू असल्याबद्दल लक्ष्मण गावडे यांनी नाराजी व्यक्त केली. सभापती हर्षदा वाळके व उपसभापती सोनू सावंत यांनीही अशी कामे पावसाळ्यापूर्वीच पूर्ण व्हायला हवी होती, असे स्पष्ट केले.

 

*जीर्ण वीज खांबांचा प्रश्न ऐरणीवर*

 

ओझरम गावात १५ ते २० वीज खांब धोकादायक अवस्थेत असल्याचे सदस्य अण्णा खाडये यांनी सांगितले. नरडवे, दिगवळे, दारिस्ते व शिवडाव येथेही अनेक वीज खांब जीर्ण झाल्याचे सदस्या सायली कृपाळ यांनी निदर्शनास आणले. दिगवळे गावात तब्बल ३२ वीज खांब पडण्याच्या स्थितीत असल्याचे त्यांनी सांगत तातडीने दुरुस्तीची मागणी केली.

 

*वन्यप्राण्यांकडून शेतीचे नुकसान*

 

ओझरम व दारूम परिसरात गवारेडे व माकडांकडून भातशेतीचे नुकसान होत असल्याचा मुद्दा सदस्य सहदेव खाडये यांनी मांडला. नुकसान झाल्यास शेतकऱ्यांनी तक्रार केल्यास नुकसानभरपाई देण्याची तरतूद असल्याचे वन विभागाने स्पष्ट केले.

 

*एसटी डेपो व्यवस्थापकांबाबत नाराजी*

 

तालुक्यातील एसटीच्या विविध समस्यांवर चर्चा करताना उपसभापती राजेश उर्फ सोनू सावंत यांनी डेपो व्यवस्थापक फोन उचलत नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. बैठकीला वरिष्ठ अधिकाऱ्यांऐवजी लिपिकांना पाठविण्यात येत असल्याबद्दलही सदस्यांनी आक्षेप घेतला. डेपो व्यवस्थापकांची प्रत्यक्ष भेट घेण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.

 

*कॉपी प्रकरणामुळे दहा विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात*

 

तालुक्यातील एका शाळेतील अनागोंदी कारभारामुळे दहावीच्या दहा विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आल्याचा मुद्दा लक्ष्मण गावडे यांनी उपस्थित केला. पुरेसा अभ्यास न शिकविल्याने विद्यार्थ्यांना कॉपी करण्याची वेळ आली आणि त्यामुळे त्यांना गुणपत्रिका मिळालेली नाही. संबंधित शाळेची मान्यता रद्द करण्याची मागणी त्यांनी केली.

 

*रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि टीव्ही वितरणावर प्रश्नचिन्ह*

 

कोकणात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत असताना काही अंगणवाड्यांमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंगची कामे का करण्यात आली, असा प्रश्न सभापती हर्षदा वाळके यांनी उपस्थित केला. दुसरीकडे अनेक जिल्हा परिषद शाळांमध्ये वीज नसतानाही टीव्ही देण्यात आल्याबद्दल उपसभापती सोनू सावंत यांनीही प्रशासनाला जाब विचारला.

 

*आरोग्य विभागातील बदल्यांवर सवाल*

 

पावसाळ्याच्या तोंडावर आरोग्य कर्मचाऱ्यांच्या बदल्या झाल्यामुळे अनेक ठिकाणी मनुष्यबळाची कमतरता निर्माण झाल्याचा मुद्दा लक्ष्मण गावडे यांनी उपस्थित केला. त्यावर बदली झालेल्या कर्मचाऱ्यांच्या जागी नवीन कर्मचारी रुजू झाल्याचा खुलासा तालुका आरोग्य अधिकारी डॉ. इंगवले यांनी केला.

 

*जिल्हा परिषद शाळांमध्ये सेमी इंग्रजीची मागणी*

 

इंग्रजी माध्यमाच्या शाळांमुळे जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थीसंख्या कमी होत असल्याने जि. प. शाळांमध्ये सेमी इंग्रजी शिक्षणाचा विस्तार करावा, अशी सूचना सदस्या मानसी मराठे यांनी केली. तालुक्यात ५२ शाळांमध्ये सेमी इंग्रजी सुरू असले तरी स्वतंत्र शिक्षक उपलब्ध नसल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली. पटसंख्या वाढविण्यासाठी अधिक प्रभावी नियोजन करण्याची गरज असल्याचेही सदस्यांनी नमूद केले.