करूळ घाटात दरड कोसळली ; वाहतूक ठप्प

वैभववाडी l प्रतिनिधी :तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे करूळ घाटात दरड कोसळून घाट मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. ही घटना शुक्रवारी दुपारी सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास घडली.

सततच्या मुसळधार पावसामुळे घाटातील डोंगराचा मोठा भाग तसेच मातीचा ढिगारा रस्त्यावर कोसळल्याने दोन्ही बाजूंची वाहतूक बंद करण्यात आली. त्यामुळे घाटात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे.

घटनास्थळी संबंधित यंत्रणेकडून जेसीबीच्या साहाय्याने माती व दरड हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून, मार्ग लवकरात लवकर वाहतुकीसाठी खुला करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.