सहकार सप्ताहानिमित्त देवगड महाविद्यालयात करिअर मार्गदर्शन वर्गाचे आयोजन

 

देवगड, : सहकार सप्ताहानिमित्त देवगड कला, वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय आणि शेठ म. ग. हायस्कूल, देवगड तसेच सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, देवगड यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयात करिअर मार्गदर्शन वर्गाचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रवीण खडपकर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी कृषी दिनाचे औचित्य साधून श्री. प्रेमानंद लहू जाधव व श्री. दिग्विजय आनंदा पावले यांच्या हस्ते शालेय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.

यावेळी श्री. प्रेमानंद जाधव यांनी सहकार क्षेत्राचे महत्त्व विशद करत सहकाराच्या माध्यमातून ग्रामीण विकासाला चालना मिळू शकते, असे सांगितले. तसेच विद्यार्थ्यांनी सहकार क्षेत्रातील संधींचाही लाभ घ्यावा, असे आवाहन केले.

करिअर मार्गदर्शन सत्रात श्री. दिग्विजय आनंदा पावले यांनी विविध स्पर्धा परीक्षा, करिअरच्या संधी आणि यशस्वी वाटचालीसाठी आवश्यक गुणांविषयी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी स्वतःची बलस्थाने ओळखून जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रम यांच्या बळावर संघर्षातून पुढे जात शिक्षणाच्या जोरावर परिस्थितीवर मात करून यश संपादन करता येते, असा प्रेरणादायी संदेश त्यांनी दिला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती स्नेहा रामाणे यांनी केले, तर श्रीमती अनुजा मुंबरकर यांनी प्रमुख अतिथींसह उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमास शिक्षक, कर्मचारी व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.