नागपूरच्या धंतोली परिसरातील एका कुटुंबातील पाच सदस्य गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता असल्याने खळबळ उडाली आहे. २४ जून रोजी घराबाहेर पडलेले हे सर्वजण अद्याप घरी परतलेले नाहीत. पोलिसांनी विविध दिशांनी तपास सुरू केला असून त्यांच्या मोबाईलचे शेवटचे लोकेशन पुणे येथे आढळल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. कुटुंबातील एका सदस्यावर मोठे कर्ज असल्याची बाबही तपासात पुढे आली आहे. बेपत्ता सदस्यांचा शोध घेण्यासाठी पोलीस आणि तांत्रिक पथके सातत्याने प्रयत्न करत आहेत.
एकाच कुटुंबातील पाच सदस्यांचा रहस्यमय बेपत्ता होण्याचा प्रकार
नागपूर : धंतोली परिसरातील ‘दुर्गा सदन’ येथील हर्षा परसवानी (५७), जितेंद्र परसवानी (४२), ईशिता परसवानी (४०), खुशी परसवानी (२१) आणि कृष्णा परसवानी (१२) हे २४ जून रोजी सायंकाळी घराबाहेर पडले. त्यानंतर ते परतलेच नाहीत. नातेवाईकांनी अनेक ठिकाणी शोध घेतला, मात्र त्यांचा कोणताही ठावठिकाणा लागलेला नाही. अखेर श्यामसुंदर परसवानी यांनी धंतोली पोलिसांकडे बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला आहे.
मोबाईलचे शेवटचे लोकेशन पुण्यात; कर्जाच्या दिशेनेही तपास
प्राथमिक तपासात कुटुंबातील एका सदस्यावर मोठे कर्ज असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच बेपत्ता व्यक्तींच्या मोबाईलचे शेवटचे लोकेशन पुणे येथे असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यांनी घरातून बाहेर पडताना कोणालाही याबाबत माहिती दिली नव्हती. त्यामुळे त्यांच्या सुरक्षिततेबाबत कुटुंबीयांमध्ये मोठी चिंता निर्माण झाली आहे.
या प्रकरणाचा तपास अतिरिक्त पोलीस आयुक्त विनिता साहू यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, तांत्रिक विश्लेषण आणि इतर सर्व शक्य दिशांनी शोधमोहीम राबविण्यात येत आहे. बेपत्ता कुटुंबाचा लवकरच शोध लागेल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.
प्रहार डिजिटल











