केतन अग्रवाल हत्याकांडानंतर सिया गोयलच्या वडिलांची भावनिक प्रतिक्रिया; FDA कारवाईवरही उपस्थित केले प्रश्न

 

केतन प्रकरणानंतर गोयल कुटुंबाची वाढली चिंता

केतन अग्रवाल हत्याकांडाला एक महिना पूर्ण झाल्यानंतर या प्रकरणात पुन्हा एकदा महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. मुख्य आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांना पुन्हा १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, सिया गोयलचे वडील प्रवीण गोयल यांनी भावनिक प्रतिक्रिया देत आपल्या कुटुंबावर होत असलेल्या कारवाईबाबत नाराजी व्यक्त केली आहे. FDA ने त्यांच्या दुकानावर टाकलेल्या छाप्यानंतर त्यांनी न्यायव्यवस्थेचा सन्मान करताना कुटुंबाला त्रास देऊ नये, अशी मागणी केली आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे गोयल कुटुंब मोठ्या मानसिक तणावातून जात असल्याचे त्यांनी सांगितले.


FDA छापेमारीनंतर प्रवीण गोयल यांचा संताप

पुणे : केतन अग्रवाल हत्याकांडाला आता एक महिना पूर्ण झाला आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांना न्यायालयाने पुन्हा १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. दरम्यान, सिया गोयलचे वडील प्रवीण गोयल यांनी माध्यमांसमोर भावनिक प्रतिक्रिया देत आपल्या कुटुंबावर होत असलेल्या कारवाईबद्दल नाराजी व्यक्त केली. अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाने त्यांच्या दुकानावर छापा टाकून खाद्यपदार्थ जप्त केल्यानंतर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

आयएएस अधिकारी तुकाराम मुंडे यांच्या नेतृत्वाखाली FDA पुणे झोन-१ च्या पथकाने १४ जुलै रोजी मार्केट यार्ड परिसरातील बी. जी. गोयल अँड कंपनी या दुकानावर कारवाई केली. हे दुकान प्रवीण गोयल यांच्या मालकीचे आहे. या कारवाईत सुमारे ४,१७२ किलो खाद्यपदार्थ जप्त करण्यात आले असून त्यांची अंदाजे किंमत ८.१४ लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले. हळद पावडर, तीळ आणि सोया मिनी चंक्स यांसह चार नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत.

FDA च्या माहितीनुसार, परवान्याशी संबंधित त्रुटी, लेबलिंग नियमांचे उल्लंघन तसेच खाद्यपदार्थांच्या दर्जा आणि गुणवत्तेबाबत शंका असल्यामुळे ही कारवाई करण्यात आली. मात्र, केतन अग्रवाल हत्याकांडाशी या कारवाईचा कोणताही संबंध नसून ही नियमित तपासणीचा भाग असल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

प्रवीण गोयल यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, केतनच्या कुटुंबाचे दुःख आम्हाला समजते आणि न्यायालयाचा आम्ही पूर्ण आदर करतो. जर माझी मुलगी दोषी ठरली तर तिला कठोर शिक्षा द्यावी, अशीही त्यांनी भूमिका मांडली. मात्र, माझा मुलगा साहिल, पत्नी आणि संपूर्ण कुटुंबाला या प्रकरणात का त्रास दिला जात आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच FDA च्या कारवाईबाबतही त्यांनी प्रश्न उपस्थित करत कुटुंबावर अन्याय होऊ नये, अशी मागणी केली.