सावडाव धबधब्यावर स्वच्छता कर वसुलीवरून पर्यटकांकडून कर्मचाऱ्यास मारहाण

दगडाने हल्ला, नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल

कणकवली : तालुक्यातील सावडाव गावठणवाडी येथील धबधबा परिसरात ग्रामपंचायतीमार्फत आकारल्या जाणाऱ्या स्वच्छता करावरून पर्यटकांच्या गटाने तात्पुरत्या कर्मचाऱ्यास मारहाण करून दगडाने हल्ला केल्याची घटना मंगळवारी (२२ जुलै) दुपारी घडली. या प्रकरणी कणकवली पोलिसांनी नऊ जणांविरुद्ध कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सावडाव काटेवाडी येथील गणेश रमेश काटे (वय ३६) हे सावडाव ग्रामपंचायतीमार्फत तात्पुरत्या स्वरूपात धबधबा परिसरात येणाऱ्या पर्यटकांकडून स्वच्छता कराची पावती देण्याचे काम करत आहेत. धबधबा परिसर स्वच्छ राहावा यासाठी ग्रामपंचायतीकडून प्रत्येक पर्यटकाकडून १० रुपये स्वच्छता कर आकारला जातो. मंगळवारी (ता.२१) दुपारी सुमारे २.१५ वाजण्याच्या सुमारास मोटारसायकलींवरून आलेल्या १० ते १३ पर्यटकांच्या गटाला गणेश काटे यांनी स्वच्छता कराची पावती घेण्याची विनंती केली. मात्र, संबंधित पर्यटक पावती न घेता पुढे जाऊ लागले. त्यावेळी दोन मिनिटे थांबा, पैसे नसतील तर देऊ नका, असे सांगितल्यानंतर काही जण संतप्त झाले. कसले पैसे? असे म्हणत त्यांनी गणेश काटे यांना हाताने मारहाण करण्यास सुरुवात केली. मारहाणीतून सुटका करून घेत गणेश काटे हे जवळील सुभाष वारंग यांच्या घराकडे धावत गेले. वारंग यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनाही धक्काबुक्की करण्यात आली. त्याचवेळी एका आरोपीने गणेश काटे यांच्या डोक्याच्या डाव्या बाजूला दगड मारल्याने ते जखमी झाले. आरडाओरड ऐकून ग्रामस्थ घटनास्थळी धावून येताच संबंधित पर्यटक मोटारसायकलींवरून पसार झाले.

मात्र, ग्रामस्थांनी दशरथ श्रीपती काटाळे याला पकडून त्याला कणकवली पोलिसांच्या ताब्यात दिले. त्याच्याकडून इतर पर्यटकांची नावे समोर आली.

सौरभ दाडमुढे याने गणेश काटे यांना हाताने मारहाण करून डोक्यावर दगड मारून दुखापत केली. तर किरण सावंत, ताज (पूर्ण नाव माहित नाही), राहुल (पूर्ण नाव माहित नाही), विशाल (पूर्ण नाव माहित नाही), ओंकार (पूर्ण नाव माहित नाही), आकाश कारटे, अक्षय पाटील आणि किरण (पूर्ण नाव माहित नाही) यांनीही हाताने मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी कणकवली पोलिसांनी सौरभ दाडमुढे, किरण सावंत, ताज (पूर्ण नाव माहित नाही), राहुल (पूर्ण नाव माहित नाही), विशाल (पूर्ण नाव माहित नाही), ओंकार (पूर्ण नाव माहित नाही), आकाश कारटे, अक्षय पाटील आणि किरण (पूर्ण नाव माहित नाही) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या कलम ११५(२), ११८(१), १८९(२), १९० व १९१(२) अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास कणकवली पोलीस करीत आहेत.