श्रावण, पळसंब परिसरात गव्यांचा धुमाकूळ!       

मसुरे | झुंजार पेडणेकर :मालवण तालुक्यातील श्रावण गावच्या हद्दीत गेल्या काही दिवसांपासून गवा रेडे मुक्तपणे वावरताना दिसत आहेत. या गव्यांमुळे श्रावणसह आडवली, पळसंब आणि बुधवळे या लगतच्या गावांमधील शेतकरी अक्षरशः हैराण झाले आहेत. गव्यांच्या या वाढत्या उपद्रवामुळे चालू खरीप हंगामातील भातशेती मोठ्या प्रमाणात उद्ध्वस्त होत असून शेतकरी गंभीर संकटात सापडले आहेत अशी माहिती पळसंबचे सरपंच चंद्रकांत गोलतकर यांनी दिली आहे.

सध्या सर्वत्र भातलावणी आणि शेतीची कामे अंतिम टप्प्यात आहेत. अशा वेळीच गवे रेडे थेट शेतांमध्ये घुसून रोपांची नासधूस करत आहेत आणि पिकांचे अतोनात नुकसान करत आहेत.

गव्यांच्या अवजड वजनामुळे भातशेती तुडवली जाऊन संपूर्ण चिखल होत आहे.

आधीच निसर्गाचा लहरीपणा आणि वाढत्या खर्चामुळे शेतकरी चिंतेत असताना, आता गव्यांच्या नुकसानीमुळे हाती येणारे पीकच नष्ट होण्याची भीती निर्माण झाली आहे.

शेतीच्या नुकसानीसोबतच आता या परिसरात मानवी सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. गव्यांचा वावर मुख्य रस्ते आणि वस्त्यांच्या जवळ वाढल्याने रात्रीच्या वेळी किंवा भल्या पहाटे शेतात जाणे शेतकऱ्यांसाठी धोक्याचे ठरत आहे. यामुळे परिसरात भीतीचे सावट पसरले आहे.श्रावण, आडवली, पळसंब आणि बुधवळे परिसरातील शेतकरी गव्यांच्या त्रासाला पूर्णपणे कंटाळले आहेत. मेहनत करून उभी केलेली शेती डोळ्यांदेखत उद्ध्वस्त होत आहे. वन विभागाने आणि शासनाने याकडे तात्काळ लक्ष देऊन ठोस उपाययोजना करावी अशी मागणी पळसंब सरपंच चंद्रकांत गोलतकर यांनी केली आहे.