मोकाट गुरांकडून पिकांच्या नुकसानीमुळे स्थानिक शेतकरी आक्रमक
गुरांची वाहतूक बंदी असल्याने सदर प्रकार घडत असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप
सावंतवाडी :मुंबई-गोवा महामार्गावरील नेमळे एरंडवाकवाडी येथे आज एका अज्ञात इसमाने एक गाय आणि चार बैल आणून सोडल्याचा प्रकार समोर आला आहे. ही मोकाट गुरे महामार्गावरून ये-जा करणाऱ्या वाहनधारकांसाठी अडथळा ठरत असून, परिसरातील शेतकऱ्यांनी नव्याने केलेल्या लावणी पिकांचे मोठे नुकसान करत आहेत.
सध्या जनावरांची टेम्पोतून वाहतूक करण्यास बंदी घालण्यात आली आहे. या बंदीमुळेच अशा प्रकारे रात्रीच्या किंवा भल्या पहाटेच्या वेळी कोणत्याही गावात किंवा महामार्गावर परस्पर गुरे सोडून देण्याचे प्रकार सुरू झाले आहेत, असा गंभीर आरोप स्थानिक शेतकऱ्यांनी केला आहे.
महामार्गावर अचानक आलेली ही गुरे आणि त्यांच्याकडून होणारे पिकांचे नुकसान यामुळे स्थानिक शेतकरी आणि वाहनचालक हैराण झाले आहेत. अशा प्रकारे बिनधास्तपणे गुरे सोडून देणाऱ्या त्या अज्ञात इसमाचा शोध घेऊन त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, तसेच या मोकाट गुरांचा बंदोबस्त करण्यात यावा, अशी जोरदार मागणी नेमळे एरंडवाक वाडीतील त्रस्त शेतकऱ्यांकडून केली जात आहे.










