सावंतवाडीकरांचा ‘ आपला माणूस ‘ संजू परब ..

सर्वसामान्य कुटुंबात जन्म घेत केवळ जिद्द चिकाटी मेहनत व महत्वाकांक्षा या गुणांच्या जोरावर समाजकारण व राजकारण यांची योग्य सांगड घालत ऐतिहासिक सुंदरवाडी नगरीचे नगराध्यक्षपद भूषविलेल्या संजू परब यांनी आज सावंतवाडीकर नागरिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. कोणत्याही प्रसंगात सुख दुःखात धावून येणारा ‘आपला हक्काचा माणूस ‘ म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. नगराध्यक्ष पदाचा कार्यकाल संपल्यानंतर ते आजही तेवढ्याच कर्तव्य भावनेने जनतेच्या प्रश्नांसाठी झटत आहेत. पदावर असो किंवा नसो, त्यांची नाळ सामान्य माणसाशी जुळलेली आहे. पदावर नसलेले नेते जेव्हा जनतेला हवेहवेसे वाटतात तेच नेते सामाजिक नेतृत्व करू शकतात. असेच कार्यकुशल नेतृत्व असलेल्या संजू परब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने..
सच्चिदानंद उर्फ संजू परब. शाखाप्रमुख, युवक काँग्रेसचा पदाधिकारी ते सावंतवाडीचे नगराध्यक्ष, एक थक्क करणारा राजकीय प्रवास.
संजू परब या नावाने आज सिंधुदुर्ग जिल्ह्यात भल्याभल्यांना दखल घ्यायला लावली. आपल्या सडेतोड बोलण्याने विरोधकांना अंगावर घेतले तर नगराध्यक्ष पदाच्या कार्यकालात तेवढ्याच ताकदीने प्रशासन चालवत आपण एक कार्यकुशल प्रशासक असल्याचेही आपल्या कतृत्वाने सिद्ध केले. नेतृत्व दातृत्व व कतृत्व या तिन्ही गुणांना मेहनतीची जोड देत समाजकारण व राजकारणाची सांगड घालत आपल्या कार्यकतृत्वाने केवळ सावंतवाडीतच नव्हे तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकारणात स्वतःची वेगळी ओळख संजू परब यांनी निर्माण केली.
नगराध्यक्ष पदावर असताना आलेल्या कोरोना महामारीच्या काळात घरात न बसता जीवावर उदार होऊन सावंतवाडीकरांसाठी रस्त्यावर उतरून त्यांना सहकार्य करत आपण केवळ राजकारण करीत नाही तर आपला वसा हा समाजकारणाचा आहे हे देखील विरोधकांना आपल्या कृतीतून दाखवून दिलं. त्यामूळेच राजकारणात विरोधक असले तरीही सर्वपक्षीय नेत्यांना संजू बद्दल नेहमीच आदर राहिला आहे.
मडूरा सारख्या ग्रामीण भागातून आलेल्या संजू परब यांचे शिक्षण, व पदवी शिक्षण सावंतवाडीतच झाले. मुळापासून नेतृत्वाचे गुण असणारा हा कार्यकर्ता माजी मुख्यमंत्री तथा केंद्रीय उद्योगमंत्री यांच्या संपर्कात आला आणि त्या परिस स्पर्शाने अक्षरशः सोने होऊन गेला. त्यानंतर त्याने कधीच मागे वळून पाहिले नाही.
मैत्री जपण्याची एक विलक्षण हातोटी संजू परब यांच्याकडे आहे. मैत्रीला नि:स्वार्थपणे जागणारा एक उत्तम मित्र. असा त्यांचा त्यांच्या मित्रपरिवारात लौकिक आहे. स्पष्टवक्तेपणा हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वाधिक महत्त्वाचा पैलू. एखाद्या पक्षाच्या नेत्यापासून ते समपातळीवरील नेत्यांपर्यंत आणि छोट्या-मोठ्या कार्यकर्त्यांसमोर ही ते अत्यंत स्पष्टपणे व परखडपणे आपली भूमिका मांडतात. त्यांनी मांडलेली मते, घेतलेली भूमिका अथवा निर्णय अचूक असतात. कोणतीही निवडणूक जिंकण्यासाठी त्या निवडणुकीचे सर्वोत्तम व्यवस्थापन हा आजच्या राजकारणाचा विजयी मंत्र आहे. संजू परब यांना हाच मंत्र गवसला आहे त्यातूनच राणे साहेबांनी दिलेली कोणत्याही निवडणूकीची जबाबदारी ते लिलया पार पाडतात व दैदिप्यमान यशही मिळवत विरोधकांना त्यांच्याच सारीपाटावर अक्षरशः चितपट करतात.

भाजपा पक्षात प्रवेशानंतर देखील लागलीच सावंतवाडी नगराध्यक्ष पदाची पोटनिवडणुक लागली. यात संजू परब यांना नगराध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून भाजपाने उमेदवारी दिली. या निवडणुकीत केंद्रीय उद्योगमंत्री नारायणराव राणे, पालकमंत्री रविंद्र चव्हाण, माजी खासदार निलेशजी राणे, आमदार नितेश राणे, माजी आमदार राजन तेली यांच्या मार्गदर्शनाखाली व आपल्या सहकारी नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या सहकार्याने संजूने या निवडणुकीत विरोधी उमेदवारावर मात करत नगराध्यक्ष पद मिळवले. महत्वाची गोष्ट म्हणजे हे नगराध्यक्ष पद सावंतवाडी तील जनतेने निवडून दिल्यामुळे मिळाले. अगदी तीन चार महिन्यापूर्वी झालेल्या निवडणुकीतील साडेतीन हजाराचा फरक काढून पावणेचारशे मतांनी ते निवडून आले हे विशेष. त्यानंतर संजूला भाजपा जिल्हा प्रवक्ते हे पद मिळाले. या पदाला न्याय देत संजूने विरोधकांना अक्षरशः अंगावर घेतले. प्रत्येक वेळी बिनतोड व स्पष्टपणे बोलून त्याने अक्षरशः विरोधकांना घाम फोडला.
आतापर्यंतच्या या प्रवासात त्याची सुविद्य पत्नी मिनल, दोन्ही मुली वैष्णवी, सई, त्यांची आई व दिवंगत वडिल यांची समर्थपणे साथ लाभली. दोनवर्षांपूर्वी आलेल्या कोरोना महामारीत संजू परब यांनी आपल्या जिवाची व कुटुंबाची पर्वा न करता फिल्डवर उतरून अनेकांना मदत केली. कुंटुंबियांनीही त्याला यात मागे खेचले नाही उलट आतापर्यंत आलेल्या प्रत्येक सुखदुःखात त्याच्या कुटुंबीयाने त्याला समर्थ साथ दिली.

दानशुरपणा हा संजूचा महत्वाचा गुण. या गुणामुळे आज संजू हा ‘जनतेच्या मनातील आमदार ‘ बनला आहे हे विशेष. होय संजू हा या मतदारसंघातील आमदारकीचा प्रबळ दावेदार आहे. यामुळेच त्याने सिंधुदुर्गातील प्रमुख विरोधी पक्षातील नेत्यांना आपली दखल घेण्यास भाग पाडले. दूरदृष्टी असलेले चाणाक्ष नेतृत्व म्हणून संजू परब यांच्याकडे पाहिले जाते. उत्तम राजकीय व्यवस्थापनाचे कौशल्य, नावीन्याचा ध्यास आणि दूरदृष्टीचे वरदान, राजकारणातील जाणकार ही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची गुणवैशिष्ट्ये आहेत.
समाजकार्यासाठी सतत नाविन्याच्या शोधात दूरदृष्टीने आणि चाणाक्षपणे ते विकासकामांची बांधणी करत सावंतवाडीला सुंदर शहर बनविण्याचा ध्यास त्यांनी घेतला आहे. त्यामूळेच सत्तेच्या राजकीय सारीपाटात एखाद्या कसलेल्या राजकारण्याप्रमाणे वावरणार्या संजू परब यांनी कोरोनाच्या संकट काळात मानवतेचे पवित्र कार्य जपत त्यांनी ”आरोग्यदूत” बनून समाज सेवेचा वसा जपला.

नगराध्यक्षपदाच्या अवध्या दोन वर्षांच्या कालावधीत कोरोनाचे संकट असूनही आपल्या कार्याची छाप पाडली. सावंतवाडी शहरातील बॅरिस्टर नाथ पै नाट्यगृह व सभागृहाचे नुतनीकरण, स्वीमींग पूल, काझी शहाबुद्दीन हॉल यासारखे अनेक बंद प्रकल्प सुरू केले. मोती तलावातील सेल्फी पॉइंट तसेच शिव उद्यानातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या चबुतर्याचे भूमिपूजन केले.
तर अनेक नव्या प्रकल्पांची मुहुर्तमेढ रोवली. यात पाळणेकोंड धरणाच्या गोडबोले गेटची उंची वाढविल्यामूळे पाणी साठा वाढण्यास मदत झाली. गेली अनेक वर्षे प्रतिक्षेत असलेल्या गाडगेबाबा भाजी मंडईचा प्रश्न मार्गी लावला. कचर्यापासून खत निर्मिती प्रकल्पाला गती दिली. तसेच सावंतवाडी शहरासाठी पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या माध्यमातून ५६ कोटी १७ लाखांची नळयोजना मंजूर केली. त्यामुळे आता सावंतवाडीकर नागरिकांना भविष्यात २४ तास पाणीपुरवठा होणार आहे. अशी एक ना अनेक कामे व प्रकल्प मार्गी लावून संजू परब यांनी सावंतवाडीकर नागरिकांच्या समस्यांचे निराकरण केले.

आता पून्हा एकदा निवडणूका होऊ घातल्या आहेत. संजू परब पुन्हा एकदा नगराध्यक्ष होऊन त्यांचे अधुरे राहिलेले कार्य पूर्णत्वास नेण्यासाठी सावंतवाडीकर नागरीक उत्सुक आहेत. तर भविष्यात केवळ सावंतवाडी शहराचेच नव्हे तर सावंतवाडी मतदार संघाचे संजू परब यांनी नेतृत्व करावे ही देखील आम जनतेची इच्छा आहे. जनतेच्या मनात असलेला आदर व प्रेम व विश्वास संजू परब नक्कीच सार्थ ठरवतील व त्यांना जनतेच्या मनातील यश नक्कीच प्राप्त होत सावंतवाडीकरांच्या सेवेची संधी पुन्हा प्राप्त होईल या त्यांच्या वाढदिनी प्रहार परिवाराच्या शुभेच्छा !

शब्दांकन व पुरवणी संकलन – सचिन रेडकर सावंतवाडी












