प्रेमचंदांच्या साहित्यातून माणूसपणाचा शोध घ्यावा : डॉ. प्रकाश कुंज

पन्हाळा : प्रतिनिधी

प्रतापसिंह काळे 

साहित्य हे केवळ मनोरंजनाचे साधन नसून समाजातील विषमता, संघर्ष, वेदना आणि सामान्य माणसाच्या जगण्याला शब्द देणारे प्रभावी माध्यम आहे. प्रेमचंदांनी आपल्या साहित्यामधून सामान्य माणसाच्या जीवनातील वास्तव आणि मानवी संवेदनशीलता प्रभावीपणे मांडली. त्यामुळे आजच्या बदलत्या काळातही प्रेमचंदांचे साहित्य तितकेच मार्गदर्शक आणि प्रासंगिक आहे, असे प्रतिपादन डॉ. प्रकाश राजाराम कुंज यांनी केले.कळे येथील विठ्ठलराव पाटील महाविद्यालयाच्या हिंदी विभागाच्या वतीने प्रेमचंद जयंतीनिमित्त आयोजित अतिथी व्याख्यानात ते बोलत होते. ‘प्रेमचंद साहित्य में चित्रित मानवीय संवेदना’ हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता.

प्रेमचंदांच्याकथा-कादंबऱ्यांमध्ये समाजातील उपेक्षित, वंचित आणि कष्टकरी माणसाच्या जीवनाचे प्रतिबिंब दिसते. त्यांच्या लेखनातून गरिबी, शोषण, अन्याय आणि विषमतेचे वास्तव समोर येते; मात्र त्याचबरोबर माणुसकी, सहानुभूती आणि संघर्षाची उमेदही दिसून येते. आजच्या काळात माणूस तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जवळ आला असला तरी भावनिकदृष्ट्या दूर जात असल्याची परिस्थिती आहे. अशा वेळी प्रेमचंदांच्या साहित्यामधील मानवी संवेदना नव्या पिढीने समजून घेणे गरजेचे आहे, असे डॉ. कुंज यांनी सांगितले.

 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. बी. गोंडसे यांची प्रमुख उपस्थिती होती. हिंदी विभागप्रमुख डॉ. नितीन पाटील यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. यावेळी प्राध्यापक, विद्यार्थी आणि हिंदी विभागातील मान्यवर उपस्थित होते.प्रेमचंद जयंतीच्या निमित्ताने आयोजित या व्याख्यानातून विद्यार्थ्यांना प्रेमचंदांच्या साहित्याकडे केवळ साहित्यिक दृष्टिकोनातून नव्हे, तर समाज आणि माणूस समजून घेण्याच्या दृष्टीने पाहण्याची नवी दिशा मिळाली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. नितीन पाटील यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. जेलिन कांबळे यांनी केले. त्यांच्या आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली.