इंदवटी निवोशी गावच्या तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी रामचंद्र उर्फ बबन भगते यांची निवड

लांजा (प्रतिनिधी): तालुक्यातील इंदवटी निवोशी गावच्या महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी रामचंद्र उर्फ बबन भगते यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
इंदवटी निवोशी ग्रुप ग्रामपंचायतीची ग्रामसभा २४ ऑगस्ट रोजी पार पडली. या सभेमध्ये उपस्थित ग्रामस्थांच्या एकमताने तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी रामचंद्र उर्फ बबन भगते यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. सामाजिक क्षेत्रातील अनुभव आणि उत्कृष्ट पद्धतीने काम करण्याची त्यांची हातोटी लक्षात घेऊन त्यांच्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
गावातील किरकोळ वाद, गैरसमज, सामाजिक मतभेद हे सामाजिक संवाद आणि सामोपचाराच्या माध्यमातून सोडवण्यासाठी प्रयत्न करू. तसेच गावातील शांतता, एकोपा आणि सामाजिक सलोखा कायम ठेवण्याच्या दृष्टीने अध्यक्ष म्हणून आपण सर्वतोपरी प्रयत्न करू अशी ग्वाही यावेळी तंटामुक्त समिती अध्यक्ष रामचंद्र उर्फ बबन भगते यांनी दिली.
या ग्रामसभेला ग्रामपंचायत प्रशासक विनोद गुरव, ग्रामपंचायत अधिकारी प्राजक्ता कदम, शासकीय कर्मचारी आणि ग्रामस्थ वर्ग उपस्थित होते. दरम्यान तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल रामचंद्र उर्फ बबन भगते यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.