
सावंतवाडी । शुभम सावंत : गणेश चतुर्थी अवघ्या काही दिवसांवर आल्याने सावंतवाडीच्या मुख्य बाजारपेठेत गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी नागरिक आणि चाकरमान्यांची तुफान गर्दी होत आहे. गणरायाच्या स्वागताची तयारी अंतिम टप्प्यात आली असून, पूजा साहित्य, फळे, फुले, माटोळीचे साहित्य, रोषणाईच्या वस्तू यासह विविध पूजासाहित्याच्या खरेदीला मोठी लगबग पाहायला मिळत आहे. बाजारपेठेत सर्वत्र गणेशोत्सवाचा उत्साह आणि चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे.
कोकणी संस्कृतीत बाप्पाच्या सजावटीत आणि पूजेमध्ये माठवीला अत्यंत मानाचे आणि महत्त्वाचे स्थान आहे. गणेश चतुर्थीच्या काही दिवस आधी सावंतवाडी बाजारपेठेत माठवी बांधण्यासाठी लागणाऱ्या विविध साहित्यांच्या खरेदीसाठी मोठी गर्दी होत असते. घराघरांत बाप्पाच्या आगमनाची तयारी करताना माठवीसाठी आवश्यक वस्तू जमविण्याची लगबग सुरू झाली आहे.
खरंतर कोकणी माणूस माठवी बांधल्याशिवाय बाप्पाची पूजा करत नाही, अशी या परंपरेशी जोडलेली श्रद्धा आहे. जंगलातील आणि परिसरातील विविध प्रकारची हंगामी फळे, फुले तसेच औषधी वनस्पती बांधून माठवी सजवली जाते. त्यामुळे माठवी ही केवळ गणपतीच्या सजावटीचा भाग नसून, कोकणातील निसर्ग, शेती आणि लोकजीवनाशी जोडलेली एक समृद्ध परंपरा आहे.
माठवीमध्ये परिसरात उपलब्ध होणाऱ्या विविध हंगामी वस्तूंचा समावेश केला जातो. यामध्ये फळे, फुले आणि औषधी वनस्पतींना विशेष महत्त्व असते. निसर्गाने दिलेल्या या समृद्धीचा गणरायाच्या पूजेत समावेश करून त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याची ही सुंदर लोकपरंपरा आहे. त्यामुळे माठवीच्या माध्यमातून कोकणी संस्कृतीतील निसर्गाशी असलेले नातेही अधोरेखित होते.
सावंतवाडीचा मुख्य बाजार गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी कोकणात प्रसिद्ध आहे. गणेश चतुर्थीच्या काही दिवस आधीपासूनच शहरातील बाजारपेठेत ग्रामीण भागातून तसेच बाहेरगावी असलेले चाकरमानी मोठ्या संख्येने खरेदीसाठी दाखल होत आहेत. माठवीसाठी लागणारे साहित्य, पूजा साहित्य, फळे, फुले, सजावटीच्या वस्तू आणि रोषणाईचे साहित्य खरेदी करण्यासाठी दुकाने आणि बाजारपेठ परिसरात गर्दी वाढली आहे.
गणेशोत्सव हा कोकणातील सर्वात मोठ्या आणि उत्साहाने साजरा होणाऱ्या सणांपैकी एक असल्याने बाजारपेठेलाही विशेष स्वरूप प्राप्त झाले आहे. गणरायाच्या आगमनासाठी घरांची स्वच्छता, सजावट तसेच पूजेची तयारी केली जात आहे. त्यात माठवीला असलेले पारंपरिक महत्त्व कायम असल्याने यंदाही माठवी बांधण्यासाठी लागणाऱ्या साहित्याच्या खरेदीला विशेष मागणी दिसून येत आहे.
गणेशभक्तांच्या वाढत्या गर्दीमुळे सावंतवाडी बाजारपेठेत सध्या उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. पारंपरिक माठवीपासून पूजा साहित्यापर्यंत विविध वस्तूंनी बाजारपेठ सजली असून, गणरायाच्या स्वागतासाठी सावंतवाडी सज्ज होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.











