मेळाव्याला युवक युवतींचा उत्स्फूर्त प्रतिसाद
वैभववाडी l प्रतिनिधी : शहीद विजय साळसकर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, वैभववाडी आणि श्री अनगरसिद्ध खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, सांगुळवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने पंडित दीनदयाळ उपाध्याय विश्वविक्रमी महाकुंभ रोजगार मेळावा सांगुळवाडी येथे उत्साहात संपन्न झाला.
या रोजगार मेळाव्याचे उद्घाटन पंचायत समिती वैभववाडीचे सभापती सिद्धेश रावराणे तसेच वैभववाडी भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष सुधीर नकाशे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी पंचायत समिती वैभववाडीच्या उपसभापती साची कोलते, जिल्हा परिषद सदस्य प्रमोद रावराणे, पंचायत समिती सदस्या सुवर्णा संसारे, राजेंद्र राणे, संस्थेचे संचालक संदीप पाटील यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
या रोजगार मेळाव्याला तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. विविध कंपन्या व आस्थापनांमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या मेळाव्यामुळे अनेक युवक-युवतींना रोजगाराची दिशा मिळणार आहे.
तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता असून, या रोजगार मेळाव्यामुळे अनेकांना रोजगार मिळण्यास मदत होणार आहे, असे पंचायत समितीचे सभापती सिद्धेश रावराणे यांनी सांगितले.












