पाण्याची टाकी व पाईपलाइन कामाचे मनीष दळवी व प्रितेश राऊळ यांच्या हस्ते भूमिपूजन…
वेंगुर्ले : दाजी नाईक
तुळस प्राथमिक आरोग्य केंद्रातील पाण्याची टाकी व पाईपलाईन दुरुस्तीचा प्रश्न आता मार्गी लागणार असून, या विकासकामासाठी महायुती सरकारच्या माध्यमातून पालकमंत्री नितेश राणे व आमदार दीपक केसरकर यांच्या प्रयत्नांतून सुमारे १५ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या कामासाठी जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी व पंचायत समिती सभापती शंकर घारे यांनी विशेष पाठपुरावा केला. या विकासकामाचे भूमिपूजन आज सोमवार ५ ऑक्टोबर रोजी जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी व जिल्हा परिषद आरोग्य व शिक्षण सभापती प्रितेश राऊळ यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.
यावेळी सभापती शंकर घारे, जिल्हा परिषद सदस्य सुजता पडवळ, भाजप तालुकाध्यक्ष पप्पू परब, सरपंच रश्मी परब, उपसरपंच नारायण कुंभार, तुळस प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. मिलिंद मोलक, डॉ. सानिया खान, ग्रामपंचायत सदस्य जयवंत तुळसकर, सचिन नाईक, मयुरी बरागडे, रतन कबरे, स्वाती सावंत, चरित्रा परब, ग्रामस्थ दादा गावडे, पोलीस पाटील सागर सावंत, जैतिर देवस्थानचे बाळू राऊळ, बाबा राऊळ, पाल सोसायटी चेअरमन कमलेश गावडे, शिवसेना विभाग प्रमुख संजय परब, रामू परब यांच्यासह स्थानिक ग्रामस्थ, आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.
वेंगुर्लेतील आरोग्य केंद्र उच्च दर्जाची व्हावीत हे उद्दिष्ट : मनिष दळवी
तालुक्यातील परुळे येथील प्राथमिक आरोग्य केंद्र चांगल्या दर्जाचे उभे राहिले आहे. त्याच धर्तीवर रेडी, तुळस व आडेली ही तालुक्यातील आरोग्य केंद्रे देखील सुसज्ज आणि उच्च दर्जाची व्हावीत, हे आमचे उद्दिष्ट आहे. तुळस प्राथमिक आरोग्य केंद्रातील पाण्याच्या टाकीचा तसेच पाईपलाईनचा प्रश्न सोडविण्यासाठी गेल्या काही काळापासून सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. या कामासाठी पालकमंत्री नितेश राणे तसेच आमदार दीपक केसरकर यांनी सकारात्मक भूमिका घेत शिफारस केली. त्यामुळे तुळस पीएचसीच्या पाणीप्रश्नासाठी सुमारे १५ लाखांचा निधी मंजूर झाला असून, या निधीतून पाण्याची टाकी व पाईपलाईन दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे. आरोग्य केंद्रामध्ये येणाऱ्या रुग्णांना आवश्यक त्या सुविधा मिळणे गरजेचे असून, त्यासाठी भविष्यातही आवश्यक तो पाठपुरावा सुरूच राहील, असे दळवी यांनी स्पष्ट केले.
आरोग्य सुविधा दर्जेदार करण्यासाठी प्रयत्नशील : प्रितेश राऊळ
आरोग्य सुविधा अधिक सक्षम आणि दर्जेदार करणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. तुळस प्राथमिक आरोग्य केंद्रातील पाण्याची समस्या दूर करण्यासाठी मंजूर झालेला निधी महत्त्वाचा असून, भविष्यात या आरोग्य केंद्राला आवश्यक त्या सर्व भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पाठपुरावा केला जाईल. आरोग्य केंद्रामध्ये योग्य दर्जाची उपकरणे, पुरेशा भौतिक सुविधा तसेच आवश्यक कर्मचारी उपलब्ध असणे गरजेचे आहे. स्टाफसंदर्भातील ज्या काही अडचणी आहेत त्या दूर करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असून इमारत बांधकाम, डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी आवश्यक सुविधा निर्माण करण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा केला जाईल. असे जिल्हा परिषद आरोग्य व शिक्षण सभापती प्रितेश राऊळ यांनी सांगितले.













