चिपळूण तालुका वार्तापत्र
संतोष सावर्डेकर/चिपळूण
दुष्काळसदृश्य परिस्थिती आणि पावसातील खंडामुळे शेती पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी चिपळूण कृषी उपविभाग अंतर्गत चिपळूण गुहागर आणि संगमेश्वर तालुक्यांमध्ये शेती नुकसान पंचनामाचे काम सुरू करण्यात आले आहेत. पालकमंत्री ना. उदय सामंत यांनी दिलेल्या निर्देशानुसार आणि जिल्हा प्रशासनाच्या सूचनेनुसार ही कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळण्यास मदत होईल.
चिपळूण, संगमेश्वर गुहागर तालुक्यात भात व नाचणी पिके सुकून चालली आहेत. सप्टेंबर महिन्यात या दोन्ही पिकांना पावसाची आवश्यकता असते. मात्र, याच काळात ८० टक्के पाऊस झाला असला तरी येथील शेतकरी अडचणीत आला आहे. त्यामुळे दुष्काळातून वगळलेल्या सात तालुक्यांचा देखील दुष्काळग्रस्त म्हणून समावेश करावा, अशी आगरी मागणी होत आहे. पावसाअभावी ५० टक्के ही पीक हाती लागणार नसल्याने मोठी समस्या निर्माण झाली आहे.
चिपळूण, संगमेश्वर गुहागर तालुक्यांमध्ये जून ते सप्टेंबर या कालावधीत सुमारे ८० टक्के पाऊस झाला आहे. मात्र, या कालावधीत पावसाची आकडेवारी समाधानकारक असली तरीही मार्गताम्हणे, रामपूर, कळकवणे आदी भागात असमान पाऊस झाला आहे. याचा मोठा परिणाम भात व नाचणी पिकावर होणार आहे. सद्यस्थितीत हातात तोंडाशी आलेले भात पीक पावसाअभावी फळधारणा न झाल्याने केवळ पेंढाच शेतकऱ्यांच्या हाती पडणार आहे. सप्टेंबर महिन्यात पावसाने मोठ्या प्रमाणात ओढ दिली.

सप्टेंबरच्या कालावधीत भात पीक फळधारणेस येते. अशावेळी जमीन ओलसर होणे व पाऊस पडणे पिकासाठी आवश्यक असते. मात्र, याच काळात पाऊस न झाल्याने भात व नाचणी पीक अडचणीत आले आहे. भात पिकाच्या शेतात जमिनीला भेगा पडल्या असून आता भातरोपे पिवळी पडू लागली आहेत. त्यामुळे भातरोपांना दाणा धरणे अशक्य झाले आहे. पावसाच्या अभावामुळे ५० टक्के पीक येणे मुश्किल बनले असून या तालुक्यांचा समावेश दुष्काळग्रस्त तालुक्यात होणे अत्यंत आवश्यक आहे. याबाबत ग्रामीण भागातील शेतकऱ्यांकडून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. वेळोवेळी कागदपत्रे पंचनामाचे फार्स केले जातात व शेतकऱ्यांना फारशी आर्थिक मदत होत नाही.
मुळात कोकणातील शेतकरी पीक कर्ज घेत नाही आणि घेतलेले कर्ज वेळेत फेडतो. त्यामुळे या कर्जमाफीचा कोकणातील शेतकऱ्यांना फारसा फायदा होत नाही. त्यामुळे येथील शेतकरी कायम शासकीय मदतीपासून वंचित राहतो. भात पिकाला खरंच पावसाची गरज असतांना पाऊस न झाल्याने कोकणातील शेतकरी अडचणीत आला आहे. या अनुषंगाने गेल्या काही दिवसांपूर्वी झालेल्या जिल्हा नियोजनच्या बैठकीत सविस्तर चर्चा झाली तर पालकमंत्री ना. उदय सामंत यांनी प्रशासनाला नुकसानग्रस्त भात, नाचणी शेतीचे पंचनामे करण्याचे निर्देश दिले. तर वगळलेल्या दुष्काळग्रस्त तालुक्यांचा दुष्काळग्रस्त तालुके म्हणून समावेश होण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा केला जाईल, असे सांगितले.
पालकमंत्री ना. उदय सामंत यांच्या निर्देशानुसार शासनाकडून मिळणाऱ्या संभाव्य मदतीसाठी तिन्ही तालुक्यात चिपळूण कृषी उपविभागातील चिपळूण, संगमेश्वर, गुहागर तालुक्यातील एकूण ४९० गावांमध्ये नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करण्यात येत आहे. प्रत्येक गावात ग्राम महसूल अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी आणि सहाय्यक कृषी अधिकारी यांची स्वतंत्र पथके नियुक्त करण्यात आली आहेत. ही पथके प्रत्यक्ष शेतावर जाऊन पिकांची पाहणी करत असून पावसातील खंड पिकांची वाढ खुंटणे रोग किडीचा प्रादुर्भाव तसेच उत्पादनावर झालेला परिणाम याबाबतची माहिती नोंदवित आहेत. नुकसानग्रस्त क्षेत्राची पाहणी करून त्यानुसार पंचनामे करण्याची प्रक्रिया सुरू आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी पंचनामा प्रक्रियेसाठी संबंधित यंत्रणेला आवश्यक माहिती व सहकार्य करावे असे आवाहन उपविभागीय कृषी अधिकारी शिवाजी शिंदे यांनी केले आहे.













