विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ व शाळा व्यवस्थापन समिती यांचा उत्स्फूर्त सहभाग
संतोष कोत्रे
लांजा : यावर्षी निर्माण झालेली दुष्काळी परिस्थिती लक्षात आणि संभाव्य पाणी टंचाई लक्षात घेऊन
तालुक्यातील जि.प.पूर्ण प्राथमिक शाळा इंदवटी नं.१ व जि.प.शाळा इंदवटी सुतार यांच्या वतीने
इंदवटी भगतेवाडी व मुचकुंदी जाधववाडी येथे विजय बंधारे बांधून पाणी अडविण्याचा शुभारंभ करण्यात आला.
यावर्षी पाऊसच कमी प्रामाणात पडला आहे. त्यामुळे भविष्यात पाणीटंचाईची समस्या मोठ्या प्रमाणावर जाणवणार आहे. पावसाच्या कमतरतेमुळे पाण्याची दुष्काळी परिस्थिती ओढवण्याची शक्यता आहे.त्यामुळे पाणी वाचविण्यासाठी पाणी जिरवणे महत्त्वाचे आहे. हे ओळखून लांजा पंचायत समिती गटविकास अधिकारी हिंदुराव गिरी यांनी आवाहन केले होते. त्याला प्रतिसाद देत इंदवटी गावच्या शाळांतील विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ व शाळा व्यवस्थापन समिती आदींनी एकत्रित येत सेवा संकल्प अभियानातून ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ मोहिमेंतर्गत बंधारे बांधले.
हे बंधारे उभारण्यात इंदवटी नं.१ शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा आरती भगते, इंदवटी सुतार शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष पांडुरंग घडशी ,दत्ताराम जाधव(पाटील),दर्शना मांडवकर, प्रकाश पांचाळ, श्रद्धा पांचाळ, वसंत इंदवटकर, रुपेश भगते ,अंगणवाडी सेविका विद्या गोसावी , वंदना इंदवटकर, सुदेश पालकर, शिवाजी जाधव, दिपक भगते, देवेंद्र भगते ,ग्रामसेविका प्राजक्ता कदम, इंदवटी नं.१ चे मुख्याध्यापक गजेंद्र पांढरे, इंदवटी सुतारचे मुख्याध्यापक महेश गुरव, शिक्षक विश्वजीत कांबळे, महेश कोळी यांनी पुढाकार घेतला.
या उपक्रमास लांजा पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी प्रशांत सोनावले, खावडी केंद्रप्रमुख उमेश केसरकर यांनी भेट दिली. यावेळी श्री.सोनावले यांनी सर्व विद्यार्थी ग्रामस्थ, पालक, शिक्षक यांचे कौतुक करुन बंधाऱ्यांचा फायदा भूजलपातळी वाढविण्यासाठी मदत होईल.गावासाठी उपयुक्त ठरेल, असे सांगून गावकऱ्यांना प्रोत्साहन दिले.













