फोंडाघाट केंद्रशाळा नं. १ मध्ये ज्येष्ठ नागरिक दिन उत्साहात साजरा !

आजी,आजोबा आणि नातवंडामधील प्रेम,माया, त्याग अन् सामंजस्य अनाकलनीय !

फोंडाघाट: कुमार नाडकर्णी –

सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षात केंद्रशाळा फोंडा नं. १ येथे ” ज्येष्ठ नागरिक दिन ” उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात प्रास्ताविक व ज्येष्ठ नागरिक दिनाच्या शपथेने करण्यात आली. त्यानंतर उपस्थित ज्येष्ठ नागरिकांचे औक्षण करून शाळेच्या वतीने सन्मानपूर्वक स्वागत करण्यात आले.

कार्यक्रमात‘आजी-आजोबा व नातवंडे संवाद’ हा विशेष उपक्रम घेण्यात आला. यामध्ये विद्यार्थ्यांनी आपल्या आजी-आजोबांशी मनमोकळा संवाद साधत त्यांच्या जीवनातील अनुभव,आठवणी सांगितल्या.. ज्येष्ठ नागरिकांनीही आपल्या जीवनातील विविध अनुभव, संस्कार, मूल्ये आणि नातवंडांचे आमच्या आयुष्यातील स्थान याबद्दल च्या आठवणी विद्यार्थी आणि शिक्षकांसोबत शेअर केल्या.

यानंतरआजी-आजोबांसाठी विविध फनी गेम्स आयोजित करण्यात आले. या खेळांमध्ये ज्येष्ठ नागरिकांनी आणि नातवंडानी उत्स्फूर्त सहभाग घेतला. त्यामुळे कार्यक्रमाला आनंददायी व कौटुंबिक वातावरण लाभले.

या कार्यक्रमास शाळेच्या मुख्याध्यापिका श्रेया नानचे, वेदांती नारकर, रंजना पाटील तसेच केंद्रप्रमुख वैभव तळेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. विद्यार्थ्यांचे आजी-आजोबा मोठ्या संख्येने उपस्थित राहून त्यांनी कार्यक्रमाचा आनंद घेतला व विविध उपक्रमांमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. यावेळी केंद्रप्रमुख तळेकर यांनी या सुखद नातेसंबंधाबद्दल आपले मनोगत व्यक्त केले.या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये ज्येष्ठ नागरिकांप्रती आदर, प्रेम, कृतज्ञता आणि आपुलकीची भावना निर्माण होण्यास मदत झाली. तसेच ज्येष्ठांचे अनुभव, संस्कार व जीवनमूल्ये पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचा अत्यावश्यक संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रदर्शन करण्यात आले. …