कणकवलीत सकल मराठा समाजाच्यावतीने शोकसभा संपन्न ; विविध क्षेत्रातील मान्यवरांनी वाहिली श्रध्दांजली
कणकवली : अखिल भारतीय मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष, सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण व आरोग्य सभापती एस. टी. सावंत यांचे नुकतेच निधन झाले. त्यानिमित्त सकल मराठा समाज कणकवलीच्यावतीने बुधवारी आयोजित शोकसभेत नगराध्यक्ष संदेश पारकर, माजी आ. वैभव नाईक ,पंचायत समिती उपसभापती सोनु सावंत, उपनगराध्यक्ष सुशांत नाईक, मराठा नेते सुरेश गवस, एस.एल. सपकाळ यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून कै. एस.टी.सावंत यांना श्रध्दांजली वाहत जुन्या आठवणींना उजाळा दिला. तसेच एस.टी. सावंत यांच्या निधनाने सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाल्याची भावना व्यक्त करण्यात आली.
कणकवली येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे कै. एस.टी.सावंत यांच्या शोकसभेनिमित्त प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी दोन मिनिटे स्तब्ध उभे राहून कै. एस.टी.सावंत यांना मान्यवरांनी श्रध्दांजली वाहिली. यावेळी कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर, माजी आ. वैभव नाईक, उपसभापती सोनु सावंत, उपनराध्यक्ष सुशांत नाईक, मराठा नेते सुरेश गवस, एस. एल. सकपाळ,संदीप राणे, सुशील सावंत,भाई परब, बॅंक संचालक समीर सावंत, पत्रकार भगवान लोके, संतोष राऊळ, सुधीर राणे,तुषार हजारे, हिरबा सावंत ,राजू रावराणे,लक्ष्मण पावसकर, ए. डी.राणे, सुहास सावंत,ॲड.अभिजित सावंत, चंद्रशेखर राणे, हरेश पाटील, बबली राणे,बाळू मेस्त्री, मंगेश यादव, सोमनाथ गायकवाड, राजन कदम,महानंद चव्हाण,सुशांत राऊळ, दीपक रासम,औदुंबर राणे, प्रदीप गायकवाड, महेश सांब्रेकर, महेश सावंत,किशोर राणे,अनुप वारंग, संतोष पुजारे,संदीप सावंत,भाई आंबेलकर, चारुदत्त साटम ,श्याम सावंत आदींसह विविध समाजातील मान्यवर उपस्थित होते.
नगराध्यक्ष संदेश पारकर म्हणाले, एस.टी.सावंत यांनी आपल्या जीवनात सामाजिक राजकीयदृष्ट्या काम उभे केले होते. जरी ते मराठा समाजाचे असले तरी त्यांनी सर्व समाजाला न्याय देण्याची भूमिका सातत्याने घेतली.
वैभव नाईक म्हणाले, सातत्याने एस.टी.सावंत मराठा समाजाच्या हितासाठी काम करत होते. त्यांच्या दुख:द निधनामुळे एक पोकळी निर्माण झाली आहे. एस.टी. सावंत यांनी उभे केलेले काम पुढे नेण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. उपसभापती सोनू सावंत म्हणाले, एसटी काका आपल्यातून गेले ही बातमी धक्कादायक आहे.समाजाबद्दल शेवटच्या श्वासापर्यंत त्यांची तळमळ होती.राजकीय,सामाजिक काम केलं आहे. उपनगराध्यक्ष सुशांत नाईक म्हणाले, समाजासाठी कसे झोकून काम करावे,ही शिकवण एस.टी. सावंत यांनी दिली. मराठा समाजाला दिशा देण्याची भूमिका त्यांची कायम राहिल. माझ्या नगरसेवक पदाच्या विजयात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. सखाराम सपकाळ म्हणाले, एस.टी.सावंत, लवू वारंग या लोकांच्या सोबत मी काम करत असल्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये परिचित झालो. जिल्ह्यात मराठा समाजाचे काम पूढे नेण्याची भूमिका आपण सर्वांनी घेवूयात. मराठा समाजाचे स्वतंत्र अस्तित्व राहिले पाहिजे.कुठल्याही राजकीय पक्षाच्या दावणीला आपण बांधू नये, असा त्यांचा प्रयत्न कायम राहिला. सुरेश गवस म्हणाले, एस. टी. सावंत यांनी मराठा समाजाच्या संघटनात्मक बांधणीसाठी तसेच सामाजिक प्रश्नांसाठी सातत्याने पुढाकार घेतला. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून शिक्षण व आरोग्य क्षेत्रातही त्यांनी उल्लेखनीय काम केले. हिरबा सावंत म्हणाले, एस.टी.सावंत ( काका ) यांच्यामुळे आम्ही घडलो. त्यांनी आम्हा सर्वांना नेतृत्व गुण दिला. सामाजिक प्रश्नांबाबत जाण करुन दिली. त्यांच्या निधनामुळे आम्ही सर्वजण पोरके झालो.
या शोकसभेत राजू रावराणे , भगवान लोके , संतोष राऊळ, महानंदा चव्हाण , सुशील सावंत यांच्यासह अन्य मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.














