लोकांनी लोकांसाठी उपयोगी पडले पाहिजे- जिल्हा उपनिबंधक राम कुलकर्णी
राजापूर (वार्ताहर): महाराष्ट्र शासनाच्या ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत ‘सेवा माझे योगदान’ या विशेष उपक्रमाच्या माध्यमातून राजापूर ग्रामीण रुग्णालय येथे रक्तदान शिबिर व आरोग्य मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली.
या उपक्रमाचे आयोजन सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, राजापूर, राजापूर महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्या., राजापूर, राजापूर तालुका जनकल्याण सहकारी पतसंस्था मर्या., राजापूर आणि राजापूर तालुका कुणबी सहकारी पतपेढी मर्या., राजापूर यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले.
रक्तदान शिबिरात सहभागी झालेल्या सर्व रक्तदात्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानपूर्वक प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. तसेच उपस्थित नागरिकांना तज्ज्ञ डॉक्टरांकडून आरोग्यविषयक महत्त्वपूर्ण माहिती व मार्गदर्शन देण्यात आले.
रक्तसंकलनाचे कार्य शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, रत्नागिरी यांच्या पथकाने केले. डॉ. अजय परदेशी, डॉ. अलिशा बडेगर व त्यांच्या टीमने रक्तसंकलनाची जबाबदारी पार पाडली.
या कार्यक्रमास जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, रत्नागिरी राम कुलकर्णी प्रमुख उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना त्यांनी सांगितले की, ‘सेवा संकल्प अभियान’चा मुख्य उद्देश शासनाच्या विविध सेवा, कल्याणकारी योजना आणि सेवा कार्यांचा लाभ सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविणे तसेच नागरिकांच्या सहभागातून सामाजिक उपक्रम राबविणे हा आहे.
“लोकांनी लोकांसाठी उपयोगी पडले पाहिजे. देहदान, नेत्रदान आणि रक्तदान अशा विविध माध्यमांतून समाजाची सेवा करता येते. रक्तदानाच्या माध्यमातून अनेकांचे प्राण वाचविण्यास मदत होते,” असे त्यांनी नमूद केले.
राजापूर येथे सहकार क्षेत्रातील विविध संस्थांनी एकत्र येऊन आरोग्यविषयक शिबिराचे आयोजन केल्याबद्दल त्यांनी सर्वांचे अभिनंदन केले. तसेच भविष्यातही सहकार विभागामार्फत शासनाचे विविध उपक्रम राबवून सामाजिक बांधिलकी जपण्याचे आवाहन त्यांनी केले.
पतसंस्था या केवळ आर्थिक व्यवहार करणाऱ्या संस्था नसून सभासद, नागरिक आणि समाजाच्या हितासाठी कार्य करणाऱ्या सहकारी संस्था आहेत, ही भूमिका या उपक्रमातून अधोरेखित झाली. असेही सांगितले.
यावेळी कुणबी पतपेढीचे अध्यक्ष प्रकाश मांडवकर व महिला पतपेढीच्या अध्यक्षा शितल पटेल यांनी मनोगत व्यक्त करून रक्तदानाचे महत्व सांगितले. सहकार क्षेत्रातील विविध संस्थांनी एकत्र येऊन रक्तदानासारखा समाजोपयोगी उपक्रम राबविल्याबद्दल उपस्थितांकडून समाधान व्यक्त करण्यात आले.
या कार्यक्रमास सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, राजापूरचे अधिकारी मुरलीधर कणखर, जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील अधिकारी संग्राम माने, राजापूर तालुका कुणबी सहकारी पतपेढीचे उपाध्यक्ष प्रकाश लोळगे यांची उपस्थिती होती. तसेच कुणबी पतपेढीचे संचालक अविनाश नवाळे, रमेश सूद, मानसी दिवटे, विद्याधर गोठणकर, अनंत मोरवसकर, स्वप्निल खटावकर, विनायक शिवगण तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पाटकर व कर्मचारी उपस्थित होते.
राजापूर तालुका महिला नागरी सहकारी पतसंस्थेच्या उपाध्यक्ष शुभांगी सोलगावकर, संचालक श्रुती ताम्हणकर, शिल्पा मराठे, सुधा चव्हाण तसेच सचिव प्रेरणा अमरे व कर्मचारी उपस्थित होते.
राजापूर तालुका जनकल्याण सहकारी पतसंस्थेच्या संचालक स्वाती बोटले व व्यवस्थापक प्रकाश हातणकर व कर्मचारी उपस्थित होते. तसेच राजापूर अर्बन बँक, शाखा राजापूरचे शाखाधिकारी रोहित सामंत, तालुक्यातील श्रमिक पतसंस्थेचे उपाध्यक्ष कृष्णकांत मोंडे, धनवर्धिनी पतसंस्था, रायपाटणचे व्यवस्थापक किशोर गुरव, सर्वोदय पतसंस्था, ओणीचे व्यवस्थापक नंदकुमार लिंगायत, ओणी परिसर पतसंस्थेचे अनिल गावडे, ओमकार पतसंस्था, सोलगावचे संचालक मल्लू कोल्हे व अधिकारी श्रीमती साटम यांच्यासह तालुक्यातील विविध सहकारी संस्थांचे पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश भाबळे यांनी केले, तर प्रास्ताविक शुभांगी सोलगावकर यांनी केले.
सहकार क्षेत्रातील विविध संस्थांनी एकत्र येत ‘सेवा माझे योगदान’ या संकल्पनेला प्रत्यक्ष कृतीची जोड देत रक्तदानासारखा समाजोपयोगी उपक्रम राबविला. या उपक्रमातून सहकारी संस्थांची सामाजिक बांधिलकी आणि समाजहितासाठी एकत्रितपणे कार्य करण्याची भावना अधोरेखित झाली.













