सात वर्षांच्या प्रतीक्षेनंतर घरात आले चिमुकलीचे आगमन
बाळंतपणानंतर आर्या गावकर यांच्या मृत्यूने असगणीसह साकेडीत शोककळा
कणकवली : सात वर्षांच्या प्रतीक्षेनंतर घरात चिमुकल्या पावलांचे आगमन झाले, कुटुंबाच्या आनंदाला पारावार उरला नव्हता. नव्या आयुष्याची स्वप्ने डोळ्यांत साठवत आईपणाचा आनंद अनुभवणाऱ्या आर्या अनिकेत गावकर (वय ३१) यांच्यावर मात्र काळाने घाला घातला. मुलीला जन्म दिल्यानंतर अवघ्या पाच दिवसांतच त्यांची प्राणज्योत मालवली. कणकवली येथील एका खासगी रुग्णालयात शनिवारी रात्री १ वा. च्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेने असगणीसह त्यांचे माहेर असलेल्या साकेडी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मालवण तालुक्यातील असगणी येथील आर्या यांचे माहेर कणकवली तालुक्यातील साकेडी येथे होते. त्यांचे पूर्वाश्रमीचे नाव ममता बाबर्डेकर होते. सुमारे सात वर्षांपूर्वी त्यांचा अनिकेत गावकर यांच्याशी विवाह झाला होता. विवाहानंतर सात वर्षांनी या दाम्पत्याच्या आयुष्यात कन्यारत्नाचे आगमन झाले. त्यामुळे कुटुंबात आनंदाचे वातावरण होते. मात्र, हा आनंद फार काळ टिकू शकला नाही. बाळंतपणानंतर आर्या यांच्यावर रुग्णालयातच उपचार सुरू होते. शनिवारी अचानक त्यांची प्रकृती बिघडली आणि रात्रीच्या सुमारास त्यांची जीवनयात्रा संपली.
आर्या या आई-वडिलांच्या एकुलत्या एक कन्या होत्या. कणकवली येथे त्या फायनान्सचे काम करत होत्या. बाळंतपणानंतर पाच दिवसांनी त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात येणार होते, अशी माहिती आहे. मात्र, घरी परतण्याची वेळ जवळ आलेली असतानाच काळाने त्यांच्यावर झडप घातली. ज्या चिमुकलीच्या आगमनाने घरात आनंद फुलला, त्याच चिमुकलीच्या जन्मानंतर अवघ्या पाच दिवसांत तिला आईच्या मायेपासून दूर व्हावे लागले. एका बाजूला नवजात मुलीच्या आगमनाचा आनंद आणि दुसऱ्या बाजूला घरातील लेकीच्या निधनाचे दुःख, अशा दुहेरी भावनिक आघाताने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
आर्या यांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, हृदयविकारामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेची नोंद करण्याची प्रक्रिया कणकवली पोलिसांत रविवारी रात्री उशिरापर्यंत सुरू होती. सात वर्षांच्या प्रतीक्षेनंतर लाभलेल्या कन्यारत्नाच्या जन्मानंतर अवघ्या पाच दिवसांतच आर्या यांनी जगाचा निरोप घेतल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.












