सावंतवाडी रोडहून सुटणार सायंकाळी ५.२० वाजता; मुंबईत दुसऱ्या दिवशी सकाळी ६ वाजता पोहोचणार
सिंधुदुर्ग : प्रतिनिधी
कोकण रेल्वेमार्गावर धावणाऱ्या सावंतवाडी रोड-मुंबई सीएसएमटी एक्स्प्रेसच्या वेळेत मध्य रेल्वेने बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. गाडी क्रमांक १५०८८ सावंतवाडी रोड-मुंबई सीएसएमटी एक्स्प्रेसच्या सुधारित वेळा १५ डिसेंबर २०२६ पासून लागू होणार आहेत.
सुधारित वेळापत्रकानुसार, ही एक्स्प्रेस सावंतवाडी रोड स्थानकातून सायंकाळी ५.२० वाजता सुटणार असून, दुसऱ्या दिवशी सकाळी ६ वाजता मुंबई सीएसएमटी स्थानकात पोहोचणार आहे.
या गाडीला कुडाळ, सिंधुदुर्ग, कणकवली, नांदगाव रोड, वैभववाडी रोड, राजापूर रोड, विलवडे, आडवली, रत्नागिरी, संगमेश्वर रोड, आरवली रोड, सावर्डा, चिपळूण, खेड, वीर, माणगाव, रोहा, पेण, पनवेल, दादर आणि ठाणे या स्थानकांवर थांबा असेल.
प्रवाशांनी सुधारित वेळापत्रकाची नोंद घ्यावी, असे आवाहन कोकण रेल्वे प्रशासनाने केले आहे. गाडीचे सविस्तर थांबे व वेळा जाणून घेण्यासाठी प्रवाशांनी www.enquiry.indianrail.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. कोकण रेल्वेच्या ताज्या अपडेट्ससाठी केआर मिरर ॲपचाही वापर करता येईल.













