▪️शिक्षक भारतीच्या मागणीवर जि. प. अध्यक्षांचे सकारात्मक पाऊल
मसुरे | झुंजार पेडणेकर : सिंधुदुर्ग जिल्हा परिषद प्राथमिक शाळांच्या दिवाळी सुट्टीच्या कालावधीत बदल करून सुट्टी दिनांक ७ नोव्हेंबर २०२६ पासून लागू करण्यात यावी, या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती शाखा सिंधुदुर्गच्या शिष्टमंडळाने जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोदजी कामत आणि शिक्षण सभापती प्रितेश राऊळ यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. यावेळी या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात कार्यरत असलेल्या अनेक शिक्षकांचे मूळ गाव परजिल्ह्यांत असल्याने दिवाळी सण कुटुंबीयांसमवेत साजरा करण्यासाठी त्यांना आपल्या गावी जाण्याची इच्छा असते. मात्र, सुट्टीचा कालावधी आणि प्रवासाचे नियोजन यामध्ये अडचणी निर्माण होण्याची शक्यता असल्याने शिक्षक भारतीच्या वतीने दिवाळी सुट्टीच्या कालावधीत बदल करण्याची मागणी करण्यात आली होती.
या मागणीची दखल घेत जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोदजी कामत व शिक्षण सभापती प्रितेश राऊळ यांनी शनिवार, दिनांक ७ नोव्हेंबर २०२६ पासून दिवाळी सुट्टी लागू करण्यात येईल, असे सकारात्मक आश्वासन दिले. तसेच, सुट्टीच्या कालावधीतील बदलाच्या अनुषंगाने शनिवारचा दिवस जादा काम करून भरून काढण्याचे आवाहनही त्यांनी केले.
शिक्षकांच्या कौटुंबिक भावना, परजिल्ह्यातील शिक्षकांच्या प्रवासाची अडचण आणि दिवाळी सणाचे सांस्कृतिक महत्त्व लक्षात घेऊन सकारात्मक भूमिका घेतल्याबद्दल शिक्षक भारतीच्या शिष्टमंडळाने अध्यक्ष व शिक्षण सभापती यांचे आभार मानले.
या शिष्टमंडळामध्ये शिक्षक भारतीचे जिल्हाध्यक्ष संतोष पाताडे, जिल्हा प्रतिनिधी किरण चेंडगे, तुकाराम खिल्लारे, सागर कु-हाडे आणि मधुकर बाचिपळे उपस्थित होते.
शिक्षकांच्या न्याय्य मागण्यांसाठी सातत्याने पाठपुरावा करून संवादाच्या माध्यमातून प्रश्न सोडविण्याचा शिक्षक भारतीचा प्रयत्न असून, या चर्चेमुळे शिक्षकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.













