महिला लोकप्रतिनिधी, अंगणवाडी सेविका व मदतनीसांचा गौरव; वेताळ प्रतिष्ठानचा उपक्रम
वेंगुर्ले : दाजी नाईक
महिला लोकप्रतिनिधींसह अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांच्या कार्याची दखल घेत वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग–तुळसतर्फे आयोजित ‘नारी सन्मान सोहळ्या’त पाच गावांतील १०० महिलांचा गौरव करण्यात आला. मठ, तुळस, होडावडे, पाल आणि मातोंड येथील महिलांना मानपत्र, शाल व श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले.
तुळस येथील कर्मयोगी रामभाऊ तुळसकर स्मृती सभागृहात झालेल्या सोहळ्याचे उद्घाटन पंचायत समिती सभापती शंकर घारे यांच्या हस्ते झाले. जिल्हा परिषद सदस्य सुजाता पडवळ प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. सरपंच रश्मी परब, कावेरी गावडे, रुपाली नाईक, रसिका केळुसकर आणि डॉ. विवेक चव्हाण यांची उपस्थिती होती.
प्रमुख वक्त्या प्रगती विवेक चव्हाण यांनी मार्गदर्शन केले. ग्रामीण भागातील महिला लोकप्रतिनिधींचे योगदान तसेच बालसंगोपन, पोषण आणि पूर्वप्राथमिक शिक्षण क्षेत्रात अंगणवाडी सेविका व मदतनीस बजावत असलेल्या भूमिकेचा या उपक्रमातून गौरव करण्यात आला.
प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. सचिन वासुदेव परुळकर यांनी प्रास्ताविक केले, तर शैलजा परूळकर यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या नियोजनासाठी महेश राऊळ, माधव तुळसकर, विवेक तिरोडकर, डॉ. गोविंद धुरी, रोहन राऊळ, नाना राऊळ, प्रसाद भणगे, सानिया वराडकर, वैष्णवी परूळकर, निकिता कबरे, भूमी परूळकर आणि भार्गवी परूळकर यांनी सहकार्य केले.













