महाराष्ट्र एन.सी.सी. डिरेक्टरेटची ‘कोकण ज्ञानतरंग’ नौका भ्रमण मोहीम सुखरूप संपन्न

जयगड बंदरात यशस्वी आगमन

रत्नागिरी :
महाराष्ट्र एन.सी.सी. डिरेक्टरेटच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘कोकण ज्ञानतरंग’ नौका भ्रमण मोहिमेचा मध्यंतर कोकणातील पालशेत बंदर येथे संपन्न झाला असून, त्यानंतर मोहिमेचा परतीचा प्रवास उत्साहात सुरू झाला आहे. आज दि. २८ ऑक्टोबर रोजी ही मोहीम बोऱ्या बंदराकडून प्रवाहित होत सुमारे २०२ किलोमीटरचा यशस्वी व सुखरूप टप्पा पार करत जयगड बंदरात दाखल झाली आहे.
पथनाट्यांच्या माध्यमातून पर्यावरण व सामाजिक प्रबोधन
या मोहिमेदरम्यान गुहागर तालुक्यातील विविध गावांमध्ये आणि शैक्षणिक संस्थांमध्ये पथनाट्यांचे सादरीकरण करण्यात आले. याद्वारे स्थानिकांमध्ये विविध विषयांवर जनजागृती व प्रबोधन करण्यात आले. या उपक्रमास स्थानिकांचा अभूतपूर्व प्रतिसाद लाभला, ज्यामध्ये प्रामुख्याने खालीलप्रमाणे सहभाग नोंदवला गेला:
बस स्टँड, गुहागर डेपो: स्थानिक नागरिकांचा सक्रीय सहभाग (२५०)
श्री देव गोपालकृष्ण माध्यमिक विद्यालय, गुहागर: विद्यार्थी व शिक्षकांचा मोठा सहभाग (९००)
के.डी.बी. कॉलेज, गुहागर: महाविद्यालयीन तरुणांचा सहभाग (१७५)
मलानी मार्ट, श्रृंगारतळी: स्थानिक नागरिकांचा सहभाग (२००)
स्थानिक लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ आणि विद्यार्थी यांच्या उत्स्फूर्त व मोठ्या उपस्थितीमुळे हे सर्व कार्यक्रम अत्यंत यशस्वी ठरले. विद्यार्थी आणि ग्रामस्थांनी या पथनाट्यांना भरभरून दाद दिली.
सांस्कृतिक भेट आणि क्रीडा उपक्रमांची सांगता
प्रवासादरम्यान एन.सी.सी.च्या छात्र सैनिकांनी कोकणातील प्रसिद्ध श्री वेळणेश्वर मंदिराला सदिच्छा भेट दिली. तसेच, कोकणातील निसर्गरम्य बीचवर विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. बीचवर खो-खो, रस्सीखेच, व्हॉलीबॉल आणि बॅडमिंटन यांसारखे खेळ खेळत विद्यार्थ्यांनी दिवसाची उत्साही समाप्ती केली.