रत्नागिरी शहर पोलिसांची धडक कारवाई; ६० हजार ५० रुपयांचा मुद्देमाल जप्त
रत्नागिरी : रत्नागिरी शहरात गांजाविक्रीसाठी बाळगलेल्या १ किलो २०१ ग्रॅम गांजासह एका २४ वर्षीय तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सूरज परशुराम नंदिवले असे या तरुणाचे नाव असून, तो रत्नागिरीतील नाचणकर चाळ, एमआयडीसी परिसरात राहत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. त्याचे मूळ गाव पाचवड, ता. वाई, जि. सातारा आहे.

दि. २८ ऑक्टोबर २०२६ रोजी प्रभारी पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विवेक पाटील यांच्या नेतृत्वाखाली रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण पथक शहर परिसरात गस्त घालत होते. यावेळी नाचणकर चाळ परिसरात एनडीपीएस कायद्यांतर्गत यापूर्वी नोंद असलेल्या सूरज नंदिवले याच्याकडे गांजा आढळून आला.
या कारवाईत एकूण ६० हजार ५० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी संबंधित तरुणाविरुद्ध अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यानुसार (NDPS Act) गुन्हा दाखल करून पुढील कारवाई सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक सतीश शिंदे, सहाय्यक पोलीस फौजदार दीपक साळवी तसेच पोलीस हवालदार शांताराम झोरे, दिनेश आखाडे, अमोल भोसले, भालचंद्र मयेकर आणि पोलीस कॉन्स्टेबल अमित पालवे व निलेश शिंगवे यांच्या पथकाने केली.










