रत्नागिरी : रत्नागिरी तालुक्यातील नाणीज येथील दरडीवाडीच्या सौ. धनश्री दीपक दरडी यांनी सोनी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय ‘कोण होणार करोडपती?’ या कार्यक्रमात आपल्या बुद्धिमत्तेच्या, ज्ञानाच्या आणि आत्मविश्वासाच्या जोरावर उल्लेखनीय कामगिरी केली आहे. कार्यक्रमाच्या हॉट सीटवर स्थान मिळवत त्यांनी तब्बल साडेसात लाख रुपयांची रक्कम जिंकली. त्यांच्या या यशामुळे नाणीजसह संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
प्रसिद्ध अभिनेत्री आणि कार्यक्रमाच्या सूत्रसंचालिका माधुरी दीक्षित यांनी विचारलेल्या एकूण १५ प्रश्नांपैकी धनश्री यांनी ११ प्रश्नांची अचूक उत्तरे दिली. विशेष म्हणजे, कोणत्याही लाईफलाईनचा वापर न करता त्यांनी पाच लाख रुपयांचा टप्पा यशस्वीरीत्या पार केला. त्यानंतर साडेसात लाख रुपयांची रक्कम जिंकल्यावर त्यांनी खेळ थांबवण्याचा निर्णय घेतला.
विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे, कोकण विभागातून या कार्यक्रमाच्या हॉट सीटवर स्थान मिळवणाऱ्या धनश्री या पहिल्या स्पर्धक ठरल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या या यशाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
धनश्री दरडी या जयगड येथील जिंदल विद्या मंदिरमध्ये संगीत शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. त्यांना गायनाची विशेष आवड असून त्या उत्तम गायिकादेखील आहेत. कार्यक्रमादरम्यान त्यांना प्रसिद्ध अभिनेत्री आणि पद्मश्री पुरस्कारप्राप्त माधुरी दीक्षित यांच्यासमोर गायन सादर करण्याची संधी मिळाली. त्यांच्या या गायनाने कार्यक्रमात आणखी रंगत निर्माण केली.
सोमवार आणि मंगळवार अशा सलग दोन दिवशी या कार्यक्रमाचे प्रसारण करण्यात आले. धनश्री यांनी आपल्या ज्ञानाच्या आणि कलागुणांच्या जोरावर मिळवलेले हे यश नाणीज गावासाठी अभिमानास्पद ठरले आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदन आणि कौतुकाचा वर्षाव होत आहे.
Home महत्वाच्या बातम्या नाणीजच्या धनश्री दरडी यांनी गाजवली ‘कोण होणार करोडपती?’ची रंगत; जिंकले साडेसात लाख...











