विवली गावची सुकन्या मृण्मयी साळवी हिची आपल्या ज्ञानाच्या जोरावर हॉट सीटपर्यंत मजल
संतोष कोत्रे
लांजा : लांजा तालुक्यातील विवली (पागरवाडी) गावची सुकन्या मृण्मयी विजय साळवी हिने आपल्या ज्ञानाच्या जोरावर लोकप्रिय दूरचित्रवाणी सोनी मराठी वरील ‘कोण होणार करोडपती या कार्यक्रमात
हॉट सीटपर्यंत मजल मारत पाच लाख रुपयांची रक्कम जिंकली आहे. हा भाग आज १२ नोव्हेंबर रोजी रात्री ९ वाजता सोनी मराठी आणि सोनी लिव्ह या वाहिनीवर प्रसारित होणार आहे.
मृण्मयी साळवी (वय २१) हिने रत्नागिरी येथील गोगटे-जोगळेकर स्वायत्त महाविद्यालयातून बी.एस्सी. आयटीचे शिक्षण पूर्ण केले आहे. सध्या ती याच महाविद्यालयात एम.एस्सी. डेटा सायन्सच्या प्रथम वर्षात शिक्षण घेत आहे.मृण्मयीला लहानपणापासूनच सामान्य ज्ञान, इतिहास आणि वाचनाची विशेष आवड आहे. या आवडीला अभ्यासाची जोड देत तिने स्वतःच्या मेहनतीच्या जोरावर सोनी मराठी या लोकप्रिय मराठी वाहिनीवर सुरू असलेल्या आणि सुप्रसिद्ध अभिनेत्री माधुरी दीक्षित सूत्रसंचालन करीत असलेल्या ‘कोण होणार करोडपती’ या लोकप्रिय कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळवली होती. कार्यक्रमातील हॉट सीटवर बसल्यानंतर तिने एकूण १५ पैकी ११ प्रश्न खेळत ५ लाख रुपयांची रक्कम जिंकली.
कोण होणार करोडपती’चे हे नवीन पर्व १२ ऑक्टोबर २०२६ पासून सोनी मराठी आणि सोनी लिव्हवर सुरू झाले आहे. या पर्वाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध अभिनेत्री माधुरी दीक्षित करत आहेत. मृण्मयी मिळवलेल्या या यशाबद्दल तिच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे. या यशस्वी प्रवासात मृण्मयीला आई-वडील आणि कुटुंबीयांचे मोलाचे सहकार्य व प्रोत्साहन लाभले.
दरम्यान, लांजा तालुक्यातील तरुणांनी, युवकांनी स्पर्धा परीक्षेकडे वळावे, विविध स्पर्धात्मक परीक्षांतून यश मिळवावे. असे आवाहन मृण्मयी साळवी यांनी केले आहे.













