कोळपे येथील बोअरवेलमधील सबमर्सिबल पंप चोरीला

वैभववाडी प्रतिनिधी :
कोळपे-बौद्धवाडी येथील शेतकऱ्याच्या बोअरवेलमधील सबमर्सिबल पंप, केबल, दोरी व पाण्याचा पाइप अज्ञात व्यक्तीने कापून चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी मनोज राजाराम कांबळे यांनी वैभववाडी पोलिसांकडे तक्रार दिली आहे.

कांबळे यांच्या कोळपे-तांबळाचा माळ येथील सर्व्हे नं. ४१/१ मधील बोअरवेलमध्ये २०१६ मध्ये बसविलेला १.५० हॉर्सपॉवर क्षमतेचा २० स्टेजचा सबमर्सिबल पंप होता. पंपाची दोरी तुटल्याने तो बोअरवेलमध्ये अडकला होता. १२ नोव्हेंबर रोजी मेकॅनिकने पंप बाहेर काढल्यानंतर सायंकाळी पुन्हा पंप बोअरवेलमध्ये सुमारे १०० फूट खोलीवर बसविण्यात आला होता. रात्री सुमारे ८ वाजता पंप बंद करून कांबळे घरी गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी ६.३० वाजता शेतात गेल्यानंतर बोअरवेलच्या ठिकाणी पंपाची दोरी व पाण्याचा पाइप कापलेला तसेच केबल वेगळी करून टाकल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. बोअरवेलमध्ये पाहणी केली असता पंपही आढळून आला नाही.

अज्ञात व्यक्तीने बोअरवेलमधील पंप बाहेर काढून त्याची दोरी, केबल व पाण्याचा पाइप कापून पंप चोरून नेल्याचा संशय कांबळे यांनी व्यक्त केला आहे. १२ नोव्हेंबर रात्री ८ ते १३ नोव्हेंबर सकाळी ६.३० या कालावधीत ही चोरी झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. चोरीच्या घटनेची माहिती मिळालातच सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजन पाटील, पोलीस हवालदार रणजित सावंत, गणेश भोवड यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आहे.