आंजणारी पूल अपघातातील जखमी युवकाचा मृत्यू!  

मसुरे | झुंजार पेडणेकर ; मुंबई-गोवा महामार्गावर रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा नजिक असलेल्या आंजणारी पुलावर शुक्रवारी पहाटे ३:३० वाजण्याच्या सुमारास सोळा चाकी ट्रक आणि खाजगी लक्झरी बस यांच्यात झालेल्या भीषण अपघातात गंभीर जखमी झालेल्या मालवण तालुक्यातील आडवली तांबळवाडी येथील रघुवीर उर्फ किरण बाळकृष्ण मसुरकर (वय ३५) या तरुणाचे उपचारादरम्यान शनिवारी सकाळी रत्नागिरी येथील रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या या अकाली व दुर्दैवी निधनामुळे संपूर्ण आडवली पंचक्रोशीत शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

▪️अपघातात गंभीर जखमी

विरार येथून प्रवाशांना घेऊन मालवणच्या दिशेने निघालेली खाजगी लक्झरी बस शुक्रवारी पहाटे लांजा नजिकच्या आंजणारी पुलावर आली होती. याच वेळी पाठीमागून ग्रॅनाईट आणि महिंद्रा कंपनीचे साहित्य घेऊन गोव्याच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या सोळा चाकी ट्रकने लक्झरी बसला पाठीमागून जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, ट्रकने बसला दोनदा धडक दिल्याने बस महामार्गावर पलटी झाली आणि तब्बल २०० मीटरपर्यंत फरपटत गेली. या दुर्घटनेत दोन्ही वाहनांमधील चालकांसह २६ हून अधिक प्रवासी जखमी झाले होते. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. रत्नागिरी एमआयडीसी अग्निशमन दलाच्या जवानांनीही शर्थीचे प्रयत्न करून बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले व उपचारासाठी रुग्णालयात हलवले.

या भीषण अपघातात रघुवीर उर्फ किरण मसुरकर यांच्या पोटाला अत्यंत गंभीर दुखापत झाली होती. त्यांना तात्काळ रत्नागिरी येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, प्रकृती अधिकच खालावल्याने शनिवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.

▪️आडवली ग्रामपंचायतला लिपिक-

रघुवीर हे आडवली ग्रामपंचायतीमध्ये लिपिक म्हणून कार्यरत होते. यासोबतच ते ‘सीएससी’ सेंटरच्या माध्यमातून ग्रामस्थांना विविध शासकीय व ऑनलाइन सेवा देण्याचे काम करत असत. मनमोकळा स्वभाव आणि मदतीची वृत्ती यामुळे त्यांनी गावात आणि परिसरात मोठा मित्रपरिवार जोडला होता. तीन वर्षांपूर्वीच त्यांचा विवाह झाला होता. त्यांच्या पश्चात पत्नी, अवघ्या एक वर्षाची मुलगी, आई, भाऊ, भावजय असा परिवार आहे. शनिवारी रात्री उशिरा आडवली येथील स्मशानभूमीत अत्यंत शोकाकुल वातावरणात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पंचक्रोशीतील ग्रामस्थ व मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता.

▪️भाऊबीज शेवटचीच ठरली!-

रघुवीर उर्फ किरण मसुरकर हे दिवाळी आणि भाऊबीज सण साजरा करण्यासाठी आपली पत्नी व एक वर्षाच्या चिमुकल्या मुलीसह मोठ्या आनंदाने मुंबई येथे गेले होते. सण आणि भाऊबीज उत्साहात साजरी केल्यानंतर, पत्नी आणि मुलीला काही दिवस मुंबईतच ठेवून ते गुरुवारी रात्री खाजगी लक्झरी बसने आडवली येथे आपल्या गावी परतण्यासाठी निघाले होते. कामाचे नियोजन आटोपून काही दिवसांनी ते पुन्हा मुंबईला जाऊन पत्नी आणि मुलीला गावी घेऊन येणार होते. मात्र, काळाने त्यांचा हा बेत अर्धवटच सोडला. शुक्रवारी पहाटे आंजणारी पुलावर झालेल्या भीषण अपघातात त्यांना गंभीर मार लागला आणि शनिवारी सकाळी त्यांची जीवनयात्रा संपली. अवघ्या तीन वर्षांपूर्वी सुखाचा संसार थाटलेल्या रघुवीर यांच्या जाण्याने आणि एक वर्षाच्या चिमुकलीच्या डोक्यावरून पितृछत्र हरपल्याने परिसरातून तीव्र हळहळ व्यक्त होत आहे.