१८ ते २९ नोव्हेंबरदरम्यान भांडुपमध्ये कोकण महोत्सवाचे आयोजन
शिरगांव (प्रतिनिधी) :
मुंबईतील भांडुप येथे आयोजित करण्यात आलेल्या २९ व्या भव्य कोकण महोत्सवात देवगड तालुक्यातील गवाणे येथील श्री गांगेश्वर शिवप्रेमी वारकरी भजन मंडळाला वारकरी दिंडी भजन सादर करण्याची संधी मिळाली आहे. गुरुवार, दि. २६ नोव्हेंबर रोजी हे मंडळ आपल्या कलाविष्कारातून उपस्थितांना वारकरी संस्कृतीचा अनुभव देणार आहे.
गवाणे या दुर्गम गावातील बालक आणि तरुणांना मोबाईलच्या अतिवापरापासून दूर ठेवून त्यांच्यामध्ये भक्तिभाव, संस्कार आणि वारकरी परंपरेची आवड निर्माण व्हावी, या उदात्त उद्देशाने मागील वर्षी नवरात्रोत्सवात या दिंडी भजन मंडळाची स्थापना करण्यात आली. अल्पावधीतच या मंडळाने गावासह परिसरात लोकप्रियता मिळवली आहे. विशेष म्हणजे, मराठी शाळेतील लहान मुलांपासून ते ३२ वर्षांपर्यंतच्या तरुणांचा अशा सुमारे ३५ जणांचा या मंडळात उत्स्फूर्त सहभाग आहे.
साधारण अडीच तास चालणाऱ्या या दिंडी भजनातून वारकरी संस्कृतीचा जागर केला जातो. आकर्षक चक्री वेशभूषा, विविध देव-देवतांची रूपे, भक्तिमय अभंग आणि पारंपरिक भजनांच्या माध्यमातून एक आगळावेगळा सांस्कृतिक आविष्कार सादर केला जातो. देवदेवतांच्या वेशभूषेतील सादरीकरण हे या दिंडी भजनाचे विशेष आकर्षण असणार आहे.
धार्मिक व सांस्कृतिक उपक्रमांसोबतच मंडळाकडून शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत आणि गरजू रुग्णांना वैद्यकीय खर्चासाठी सहकार्य करून सामाजिक बांधिलकीही जपली जाते.
दि. १८ ते २९ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत स्व. अटलबिहारी वाजपेयी मैदान, कोकणनगर, भांडुप येथे २९ व्या कोकण महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. ग्रामीण भागातील कलावंतांना मुंबईसारख्या महानगरात आपली कला सादर करण्यासाठी मिळणारे हे व्यासपीठ महत्त्वपूर्ण ठरत आहे. या महोत्सवात गवाणेच्या वारकरी दिंडी भजन मंडळाला मिळालेली संधी ही संपूर्ण गावासाठी अभिमानास्पद बाब ठरली आहे.













