कोकणात तुझं माझं जमेना तुझ्याशिवाय करमेना…!

वार्तापत्र -कोकण संतोष वायंगणकर.

कोकणातील राजकिय पक्ष, रायगड जिल्ह्यातील कुरघोडीचे राजकारण, तिथला सत्ता संघर्ष आणि कधी सुप्त, कधी उघडपणे राजकिय नेते पुढाऱ्यांकडून केल्या जाणाऱ्या स्टेटमेंट या सर्वांचा विचार करत असताना कोकणच राजकारण हे नेहमीच संघर्षाच आणि विकासाचा कोणताही विचार चर्चा नसलेलं राजकारण आजपर्यंत राहीलं आहे. केवळ विरोध करणे या एवढ्याच भुमिकेतून स्वत:च राजकिय महत्व वाढवण्यासाठी राजकारण केलं जात हे कोकणच दुर्दैव म्हणावं लागेल…

कोकणातलं राजकारण हे महाराष्ट्रातील इतर भागांतील राजकारणापेक्षा फारच निराळ आहे. कोकणातील राजकारण हे विकासापेक्षा राजकारणावर आधारलेलं अधिक रहात. विकासावर चर्चा झाली आहे असं चित्र फार कमी वेळा पहायला मिळत. त्यामुळे कोकण आणि उर्वरित महाराष्ट्राच राजकारण हे फारच वेगळ आहे. महाराष्ट्राच्या इतर भागात विकासाच्या मुद्यांवर विरोधक देखिल एकत्र येतात. म्हणूनच विकासाच्याबाबतीत महाराष्ट्राच्या विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र इथल चित्र आणि विकासाची गती ही अधहिक गतीमान आहे. पश्चिम महाराष्ट्रात सहकार रूजला, फोफावला आणि वटवृक्षासारखा उभा राहिला त्यामागच हेच प्रमुख कारण आहे. कोकणात रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या तिन्ही जिल्ह्यांमध्ये विकासावर कधी चर्चा नाहीच उलट विकासाला विरोधाचीच भुमिका रहाते. रायगड जिल्ह्यामध्ये महायुतीतील राष्ट्रवादी (अजित पवार गट) आणि शिवसेना यांच्यातला राजकीय संघर्ष काही थांबायच नाव घेईना अशी स्थिती आहे. राज्यात भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवारगट) अशी महायुतीची सतता आहे. सत्ता म्हणून विविध राजकीय पक्ष एकत्र येतात. सत्तेत सहभागी होतात. परंतु त्यापलिकडे जाऊन मग प्रत्येकाच त्या-त्या जिल्ह्यात राजकीय पक्ष आणि नेत्यांच कुरघोडीच राजकारण सुरूच रहात. ‘‘तुझं माझं जमेना, तुझ्या शिवाय करमेना’’ अशी काहीशी विचित्र अवस्था रायगडमधील राजकीय पक्ष आणि नेत्यांची आहे. रायगड जिल्ह्यावर आपलच वर्चस्व राहिलं ते रहाण्यासाठी प्रयत्न सुरू असतात. म्हणूनच खा.सुनिल तटकरे आणि शिवसेना असा सुप्त संघर्ष कधी ऑन स्टेज तर अनेकवेळा एक-दुसऱ्याला जाणवू न देता दबावाच राजकारण ज्या पद्धतीने केलं जात त्याची चर्चा मग राज्यभरात होत रहाते. महायुतीची सत्ता स्थापन झाल्यावर दोन वर्ष रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा वाद सुरूच होता. खा.सुनिल तटकरे यांची कन्या अदिती तटकरे या पालकमंत्री होत्या. अलिकडे ना.भरतशेठ गोगावले हे पालकमंत्री आहेत. आ.महेंद्र दळवी यांचही खा.सुनिल तटकरे यांच्याशी जमत नाही. मात्र तरीही परस्परांमध्ये टोकाच राजकीय वैर असतानाही आ.अनिकेत तटकरे यांच्या विधान परिषद निवडणुकीत सर्व जुळवा-जुळव करण्यात आली. ही विधानपरिषदे निवडणुकीतील समझोता एक्सप्रेस खूप काळ काही चालू राहू शकली नाही. शिवसेना आणि खा.सुनिल तटकरे यांच्यातले मतभेद कायमच राहिले. रायगड रत्नागिरी जिल्ह्यातील शिवसेना आमदार आणि खा.सुनील तटकरे यांच जमलं नाही.आजही ते तसेच आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्याकडून जेव्हा-जेव्हा संधी मिळते तेव्हा-तेव्हा एक-दुसऱ्यावर कुरघोडी करण्याची एकही संधी शिवसेना किंवा राष्ट्रवादी काँग्रेसकडून दवडली जात नाही कोणत्याही स्थितीत जशास तसे उत्तर देण्याची भाषा आणि भाषण नेहमीच सुरू रहातात. यातच रत्नागिरी जिल्ह्यातील माजी मंत्री रामदास कदम आणि खा.सुनिल तटकरे यांच्यातला संघर्ष टोकावरचा झाला आहे. तो संघर्ष गेले काही महिने सुरूच आहे. रायगडमधील शिवसेनेचे आमदार आणि खा.सुनिल तटकरे यांच्यातला राजकीय संघर्ष रोजचाच झाला आहे. रायगड जिल्ह्यावर राजकीय वर्चस्व आपलेच राहील पाहिजे यासाठीची ही राजकिय धडपड आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विरोधी पक्ष शेवटच्या घटका मोजत आहेत. अशी स्थिती आहे. कोकणात शेतकरी कामकरी पक्ष रायगड पुरता मर्यादित होता. एक काळ कोकणातील रायगड जिल्ह्यावर सर्व सत्ताकेंद्र या शेतकरी कामकरी पक्षाच्या हाती होती. शेकाप म्हणेल ती पूर्वदिशा इतका राजकिय वचक शेकापचा होता. परंतु खा.सुनिल तटकरेंच्या राजनितीने शेकाप रायगडवेशीबाहेर कधी गेली हेच पाटील बंधूना समजल नाही. कधी सोबत घेत. दिलजमाई करत, सत्तेत वाटेकरी होत तर कधी सोबत आहोत असे भासवत. रायगडच्या राजकारणात हळू-हळू शेकापचे महत्व कमी कस होईल याची नियोजनबद्ध आखणी करून शेकापपूर्वी कधीतरी रायगड जिल्ह्यात एक राजकिय पक्ष होता असं म्हणायला लावण्यापर्यंत स्थिती निर्माण करण्यात खरंतर खा.सुनिल तटकरे यशस्वी झाले असं म्हटलं तर वावग ठरणार नाही. राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना उद्धव ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट कोकणात फारसे कुठे दिसत नाही. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मधल्या पाच वर्षात अजुनही सूर सापडलेला नाही. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील गटबाजी सुप्त संघर्ष आणि नेतृत्वाअभावी उबाठाची कोकणात दयनिय अवस्था आहे. जे उबाठाचे पुढारी आहेत ते पत्रकापुरते मर्यादित आहेत. त्यामुळे कोकणातील राजकिय पक्ष, रायगड जिल्ह्यातील कुरघोडीचे राजकारण, तिथला सत्ता संघर्ष आणि कधी सुप्त, कधी उघडपणे राजकिय नेते पुढाऱ्यांकडून केल्या जाणाऱ्या स्टेटमेंट या सर्वांचा विचार करत असताना कोकणच राजकारण हे नेहमीच संघर्षाच आणि विकासाचा कोणताही विचार चर्चा नसलेलं राजकारण आजपर्यंत राहीलं आहे. केवळ विरोध करणे या एवढ्याच भुमिकेतून स्वत:च राजकिय महत्व वाढवण्यासाठी राजकारण केलं जात हे कोकणच दुर्दैव म्हणावं लागले. कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्हे कोकणातील तीन जिल्हे असले तरीही या तिन्ही जिल्ह्यातील राजकारण वेगवेगळया पद्धतीचे आहे. कोकणच्या विकासाचा एक समान धागा कोकणच्या राजकारणात सापडत नाही. परंतु तरीही रायगडमध्ये मात्र तुझे माझे जमेना आणि तुझ्याशिवाय करमेना अशीच स्थिती आहे.