रिगल कॉलेजतर्फे व्यवसाय मार्गदर्शन शिबीर उत्साहात

चिपळूण (प्रतिनिधी) : बारावीनंतर पुढे काय? हा प्रश्न प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनात असतो. याच प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी रिगल कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड टुरिझम, चिपळूण यांनी महादेवराव शिर्के माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, भोम आणि न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज पाचाड येथे विद्यार्थ्यांसाठी विशेष करिअर मार्गदर्शन सत्र आयोजित केले. हॉटेल मॅनेजमेंट अभ्यासक्रम आणि त्यातून मिळणाऱ्या नोकरी-व्यवसायाच्या संधींची माहिती विद्यार्थ्यांना या निमित्ताने मिळाली.
रिगल कॉलेजच्या प्राध्यापकांनी दोन्ही महाविद्यालयांत जाऊन विद्यार्थ्यांशी थेट, मोकळेपणाने संवाद साधला. हॉटेल (हॉस्पिटॅलिटी) उद्योग म्हणजे नेमके काय, तो कसा चालतो आणि त्यात कोणत्या प्रकारची कामे असतात, हे त्यांनी सोप्या भाषेत समजावून सांगितले. भारतात तसेच जगभरात पर्यटन उद्योग वेगाने वाढत असून प्रवासी, हॉटेल्स आणि रिसॉर्ट्सची संख्या सतत वाढत आहे. त्यामुळे प्रशिक्षित मनुष्यबळाची मागणीही वाढत आहे. या संधीचे सोने करण्यासाठी विद्यार्थ्यांनी आतापासूनच स्वतःला तयार ठेवावे, असे आवाहन त्यांनी केले.
हॉटेल मॅनेजमेंट म्हणजे फक्त हॉटेलमधील नोकरी, या मार्गदर्शनातून दूर करण्यात आला हॉटेल्स आणि रिसॉर्ट्सबरोबरच क्रूझ लाइनर्स, विमान कंपन्या, केटरिंग, हॉस्पिटल्स, ट्रॅव्हल व टुरिझम कंपन्या अशा अनेक क्षेत्रांत या शिक्षणाचा उपयोग होतो. फ्रंट ऑफिस, हाउसकीपिंग, फूड प्रोडक्शन (किचन) आणि फूड अँड बेव्हरेज सर्व्हिस हे हॉटेलचे चार प्रमुख विभाग असून आपल्या आवडीनुसार यापैकी कोणत्याही विभागात करिअर करता येते. बारावीनंतर बी.एस्सी. हॉस्पिटॅलिटी स्टडीज या मुंबई विद्यापीठाद्वारे चालविण्यात येणाऱ्या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळवता येतो. महाविद्यालयामार्फत विद्यार्थ्यांना नामांकित हॉटेल्समध्ये प्रत्यक्ष काम करण्याची संधी मिळते. केवळ पुस्तकी ज्ञान नव्हे, तर प्रत्यक्ष अनुभव, आत्मविश्वास आणि उद्योगाशी ओळख शिक्षण पूर्ण होण्यापूर्वीच मिळते. भारतातील तसेच परदेशातील हॉटेल्समध्येही प्रशिक्षण आणि नोकरीच्या संधी उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले.
निसर्गसौंदर्य, स्वच्छ समुद्रकिनारे, ऐतिहासिक किल्ले, मंदिरे आणि चविष्ट खाद्यसंस्कृती यांमुळे कोकण हे पर्यटकांचे आवडते ठिकाण आहे. त्यामुळे स्थानिक तरुणांना आपल्या भागातच पर्यटन व आतिथ्य क्षेत्रात नोकरी मिळू शकते. एवढेच नव्हे, तर होमस्टे, रेस्टॉरंट, केटरिंग सेवा, ट्रॅव्हल एजन्सी किंवा टूर गाइडिंगसारखा स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचीही उत्तम संधी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. हे सत्र केवळ मार्गदर्शनापूरते मर्यादित न ठेवता ते प्रत्यक्ष अनुभव देणारे व्हावे, यासाठी प्राध्यापक वर्ग यांनी विद्यार्थ्यांच्या मदतीने विविध प्रात्यक्षिके सादर केली. रंगीबेरंगी आणि चविष्ट मॉकटेल्स तयार होताना पाहून विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर कुतूहल दिसत होते. टॉवेलपासून हंस, फुले आणि विविध आकृत्या प्रा अराफत सुर्वे यांनी करून दाखविल्या.काही विद्यार्थ्यांनी स्वतः प्रयत्न करून पाहिला, तर अनेकांनी प्रश्न विचारून आपल्या शंकांचे निरसन करून घेतले. या मार्गदर्शनामुळे हॉटेल मॅनेजमेंट आणि पर्यटन क्षेत्राबद्दलचे गैरसमज दूर झाले असून करिअरची नवी दिशा मिळाल्याची भावना अनेक विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. भोम व पाचाड कनिष्ठ महाविद्यालयांच्या प्राचार्य व शिक्षकवृंदाने रिगल कॉलेजच्या या उपक्रमाचे कौतुक करून आभार मानले. यापुढेही असे उपक्रम राबवले जावेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.