सर्जनशील संवेदनांचा उत्कट काव्यस्वर हरपला

प्रा. डॉ. शरयू आसोलकर यांच्या निधनाने वेंगुर्ल्यात शोकभावना : आनंदयात्री वाड्मय मंडळातर्फे आदरांजली

वेंगुर्ले : दाजी नाईक
साहित्यविश्वात आपल्या प्रतिभेचा, संवेदनशीलतेचा आणि काव्यात्म अभिव्यक्तीचा स्वतंत्र ठसा उमटविणाऱ्या प्रा. डॉ. शरयू आसोलकर यांच्या अपघाती निधनाने साहित्यप्रेमींच्या मनावर दुःखाची छाया पसरली आहे. त्यांच्या स्मृतींना उजाळा देत आनंदयात्री वाड्मय मंडळाच्या वतीने बॅ. बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयात शोकसभा आयोजित करण्यात आली. या सभेत उपस्थित साहित्यिक, कवी, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी शरयूताईंच्या व्यक्तिमत्त्वातील विविध पैलू आणि त्यांच्या साहित्यिक योगदानाच्या आठवणी जागवून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

शरयू आसोलकर यांच्या निधनाने केवळ एक साहित्यिक व्यक्तिमत्त्व हरपले नसून, शब्दांतून भावना जिवंत करणारा, कवितेतून जीवनाचे सूक्ष्म पदर उलगडणारा आणि साहित्यविश्व समृद्ध करणारा एक संवेदनशील स्वर काळाच्या पडद्याआड गेला, अशी भावना यावेळी व्यक्त झाली.

आठवणींतून उलगडले शरयूताईंचे व्यक्तिमत्त्व

या शोकसभेत ज्येष्ठ साहित्यिका व आनंदयात्री वाड्मय मंडळाच्या अध्यक्षा वृंदाताई कांबळी, सिंधुदुर्गातील समकालीन कवी वीरधवल परब, कवी विठ्ठल कदम, स्नेहल कदम, साप्ताहिक किरातच्या संपादक सीमा मराठे, नगरसेविका शितल आंगचेकर, राकेश वराडकर, विशाखा वेंगुर्लेकर, प्रदीप कुबल, सिताराम टाककर, कृष्णा दर्शन जाधव, वासुदेव पेडणेकर, सुरेंद्र चव्हाण, प्रा. पांडुरंग कौलापुरे, महेश राऊळ, प्रा. डॉ. सचिन परुळकर आदी उपस्थित होते.

वीरधवल परब, विठ्ठल कदम, शितल आंगचेकर, प्रा. पांडुरंग कौलापुरे, सुरेंद्र चव्हाण, राकेश वराडकर आणि वृंदाताई कांबळी यांनी शरयूताईंसोबतच्या विविध आठवणींना उजाळा दिला. त्यांच्या साहित्यिक जाणिवा, वैचारिक समृद्धी, भावस्पर्शी लेखन आणि सहवासातील जिव्हाळा यांचे स्मरण करत उपस्थितांनी त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील विविध पैलू उलगडले.

शरयूताईंच्या साहित्याने शब्दांना संवेदनेची किनार दिली, विचारांना भावनेचे बळ दिले आणि वाचकांच्या मनात हळुवारपणे घर केले. त्यांच्या जाण्याने साहित्यविश्वात निर्माण झालेली पोकळी सहज भरून निघणारी नाही. त्यांच्या साहित्यकृती आणि स्मृती मात्र रसिकांच्या मनात दीर्घकाळ दरवळत राहतील, अशा भावपूर्ण वातावरणात शोकसभा झाली.