रात्री महामार्गावर पडलेल्या मृत म्हैशीमुळे अपघाताचा धोका
जिल्हा वाहतूक शाखेच्या पोलीस कर्मचाऱ्यांची तत्परता
कणकवली : हुंबरट येथे मुंबई-गोवा महामार्गावर रविवारी रात्री ११.१५ वाजण्याच्या सुमारास अज्ञात वाहनाने म्हैशीला धडक दिल्याने तिचा मृत्यू झाला. अपघातानंतर मृत म्हैस महामार्गावरच पडून राहिल्याने वाहनचालकांसाठी धोका निर्माण झाला होता. रात्रीच्या वेळी वेगाने येणाऱ्या वाहनांना या म्हैशीचा अंदाज न आल्यास आणखी अपघात होण्याची शक्यता होती.
याचदरम्यान नाकाबंदी संपवून परतत असताना जिल्हा वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांना हा प्रकार निदर्शनास आला. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन आशिष जाधव, संदेश आबिटकर, श्री. पाटील यांनी तत्काळ घटनास्थळी थांबून शेजारील घरातील मरीये कुटुंबातील व्यक्तींच्या मदतीने दोरीच्या साहाय्याने मृत म्हैस रस्त्याच्या मधोमध असलेल्या मोकळ्या पॅसेजमध्ये हलविण्यात आली. याबाबत महामार्ग पोलीस व संबंधित यंत्रणेलाही माहिती देण्यात आली. रात्रीच्या वेळी महामार्गावरील संभाव्य अपघाताचा धोका लक्षात घेऊन वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांनी दाखविलेल्या या तत्परतेचे कौतुक होत आहे.













