चिपळूणच्या वालोपे खून प्रकरणाचा अवघ्या पाच दिवसांत छडा…! संशयित आरोपी कोल्हापुरातून जेरबंद… तर तपास पथकाला ३० हजार रुपयांचे बक्षीस जाहीर…!

चिपळूण शहरातील वालोपे परिसरात झालेल्या तरुणाच्या निर्घृण हत्या प्रकरणाचा उलगडा करण्यात चिपळूण पोलिस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला यश आले आहे.

तांत्रिक तपास, सीसीटीव्ही फुटेज आणि मोबाईल कॉल डिटेल्सच्या आधारे पोलिसांनी अवघ्या पाच दिवसांत संशयित आरोपीचा शोध घेतला. पवन आंबेडे असे या संशयिताचे नाव असून, त्याला कोल्हापूर येथून ताब्यात घेण्यात आले आहे.

१६ नोव्हेंबर रोजी चिपळूणमधील वालोपे परिसरात एका तरुणाचा रक्ताने माखलेला मृतदेह आढळून आला होता. पानटपरीच्या मागील बाजूस असलेल्या मोकळ्या जागेत हा मृतदेह होता. तरुणाच्या डोक्यावर गंभीर जखमा होत्या. घटनास्थळी रक्ताने माखलेला जांभ्या दगडही आढळून आला होता. याच दगडाने डोक्यावर प्रहार करून हत्या करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला होता.

सुरुवातीला मृताची ओळख पटविणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. मात्र, तपासादरम्यान मृत तरुणाची ओळख नवनाथ बबन कांबळे अशी पटली. तो मूळचा सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यातील असून, चिपळूण येथे मामाकडे राहत होता.

या गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची कसून तपासणी केली. रेल्वे स्थानक परिसरापासून महामार्गापर्यंतच्या अनेक कॅमेऱ्यांमधील दृश्ये तपासण्यात आली. त्याचबरोबर संशयितांचे मोबाईल कॉल डिटेल्स आणि तांत्रिक माहितीचे विश्लेषण करण्यात आले.

या तपासातून संशयिताचा माग काढण्यात पोलिसांना यश आले. सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यातील पवन आंबेडे याच्यावर संशय निश्चित झाल्यानंतर पोलिसांनी त्याचा शोध घेतला. अखेर कोल्हापूर येथे सापळा रचून त्याला ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

दरम्यान, या हत्येमागील नेमके कारण काय? आर्थिक व्यवहारातून हा प्रकार घडला का? तसेच या गुन्ह्यात आणखी कोणाचा सहभाग आहे का? या सर्व बाबींचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

पोलीस अधिकारी आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने समन्वयाने काम करत तांत्रिक तपासाच्या आधारे या गुन्ह्याची उकल केली. या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत तपास पथकाला ३० हजार रुपयांचे पारितोषिक जाहीर करण्यात आले आहे.

अवघ्या पाच दिवसांत खुनाच्या गुन्ह्याचा छडा लावणाऱ्या चिपळूण पोलिसांच्या या कामगिरीचे कौतुक होत आहे.

अनघा निकम मगदूम
प्रहार डिजिटल, रत्नागिरी.