डेरवणमध्ये १ ते ३ डिसेंबरदरम्यान राज्यस्तरीय किशोर गट कबड्डी स्पर्धेचा थरार!

३७ वी राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धा
 संघर्ष क्रीडा मंडळ, चिपळूणकडे यजमानपद

चिपळूण (प्रतिनिधी) : कबड्डी क्षेत्रात गेली ४४ वर्षे सातत्याने उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संघर्ष क्रीडा मंडळ, चिपळूण यांच्याकडे ३७ व्या किशोर गट राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी कबड्डी स्पर्धेचे यजमानपद सोपविण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या विश्वासाला पात्र ठरत ही प्रतिष्ठेची स्पर्धा आयोजित करण्याचा मान मंडळाला मिळाला आहे. ही राज्यस्तरीय स्पर्धा दि. १ ते ३ डिसेंबर २०२६ या कालावधीत चिपळूण तालुक्यातील डेरवण येथील श्री विठ्ठलराव जोशी चॅरिटेबल ट्रस्टच्या क्रीडा संकुलातील क्रीडांगणावर मॅटवर खेळविण्यात येणार आहे.
सकाळ आणि सायंकाळ अशा दोन सत्रांत स्पर्धेचे सामने रंगणार आहेत. संघर्ष क्रीडा मंडळ गेली ४४ वर्षे क्रीडा, कला आणि सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत असून कबड्डी क्षेत्रातील त्यांचे योगदान विशेष उल्लेखनीय आहे. मंडळाच्या या सातत्यपूर्ण आणि दैदीप्यमान कामगिरीची दखल घेत महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनने ही महत्त्वपूर्ण स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्याची जबाबदारी मंडळावर सोपविली आहे. या स्पर्धेतून राष्ट्रीय किशोर गट कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या संघासाठी संभाव्य खेळाडूंची निवड करण्यात येणार आहे. त्यामुळे राज्यातील विविध जिल्ह्यांतील युवा कबड्डीपटूंना आपले कौशल्य दाखविण्याची मोठी संधी मिळणार आहे. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व जिल्हा कबड्डी संघांनी दि. ३० नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी ठीक ४ वाजता उपस्थिती नोंदवावी, असे आवाहन महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या वतीने करण्यात आले आहे.
या स्पर्धेच्या निमित्ताने राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील नामवंत कबड्डीपटू तसेच कबड्डी क्षेत्रातील पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याने डेरवण येथे कबड्डीचा मोठा क्रीडामहोत्सव रंगणार आहे. या राज्यस्तरीय स्पर्धेमुळे चिपळूणच्या क्रीडा क्षेत्राच्या लौकिकात आणखी भर पडणार आहे.