रत्नागिरी : प्रतिनिधी
रत्नागिरी येथील भारतीय तटरक्षक दलाच्या (कोस्टगार्ड) बांधकाम प्रकल्पातील उपकंत्राटाच्या कामात पुण्यातील एका महिला इंटिरियर डिझायनर व कंत्राटदाराची तब्बल ८० लाख १७ हजार ८३६ रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी नाशिक येथील मुख्य कंत्राटदार कंपनीच्या मालकासह पुण्यातील चार जणांविरुद्ध रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी पुण्यातील वारजे (अतुल नगर, यश अपार्टमेंट) येथील रहिवासी आणि ‘अंतरा डिझाईन स्टुडिओ’च्या संचालिका सौ. अश्विनी सुनील आंबेकर (३४) यांनी २३ नोव्हेंबर रोजी रात्री रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी दिगंबर आनंदराव पिंगळे (मालक, मेसर्स प्राड इन्फ्रा कंपनी, रा. नाशिक) श्रीधर सुरेंद्र लोंढे (प्रकल्प व्यवस्थापक, रा. पुणे),दिनेश नाडगोंडे (प्रकल्प समन्वयक, रा. पुणे) आणि राजू खेतावत (मालक, श्रुती असोसिएट्स, रा. पुणे) यांच्याविरुद्ध भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम ३१८(४) आणि ३(५) (जुने भादंवि कलम ४२०, ३४) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
अशी झाली फसवणूक
नाशिक येथील ‘मेसर्स प्राड इन्फ्रा’ कंपनीला कोस्टगार्ड रत्नागिरी येथे बांधकामाचा ठेका मिळाला होता. या कंपनीचा मालक दिगंबर पिंगळे याने फिर्यादी आंबेकर यांच्याशी रीतसर करार करून १५ जून २०२६ ते २० ऑक्टोबर २०२६ या कालावधीत कोस्टगार्डच्या झाडगाव येथील ‘मॅरीड अकोमोडेशन’ (एस+७ व ८ बिल्डिंग) इमारतीचे फिनिशिंग वर्क आणि मिलिटरी इंजिनिअर सर्व्हिसेसच्या (MES) ओटीएम गॅरेजचे आर.सी.सी. स्लॅब लेबर वर्क दिले होते.फिर्यादींनी हे काम पूर्ण केल्यानंतर फिनिशिंग कामाचे अंतिम बिल ५५ लाख १२ हजार ५०५ रुपये आणि गॅरेज स्लॅब कामाचे जीएसटीसह बिल २५ लाख ५ हजार ३३१ रुपये, अशी एकूण ८० लाख १७ हजार ८३६ रुपयांची रक्कम थकीत होती.
करार रद्द न करता परस्पर दुसऱ्या कंपनीला वर्क ऑर्डर
आरोपी दिगंबर पिंगळे यांनी फिर्यादींच्या ‘अंतरा डिझाईन स्टुडिओ’सोबत केलेला करार अधिकृतरीत्या रद्द न करता आणि कामाचा वाद सुरू असतानाही, परस्पर पुण्यातील ‘श्रुती असोसिएट्स’चे मालक राजू खेतावत यांना वर्क ऑर्डर देऊन नवा करार केला. प्राड इन्फ्रासोबत काम सुरू असल्याची आणि थकीत बिलांबाबत वाद सुरू असल्याची पूर्ण कल्पना असतानाही, राजू खेतावत यांनी फिर्यादींचे ना-हरकत प्रमाणपत्र (NOC) न घेता व त्यांच्याशी कोणताही संपर्क न साधता हा करार केला. नव्या करारात फिर्यादींच्या येणे बाकी असलेल्या रकमेचा कोठेही उल्लेख करण्यात आलेला नाही. अशा प्रकारे सर्व आरोपींनी संगनमत करून आर्थिक फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. रत्नागिरी ग्रामीण पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.













